What is Keyword in Marathi, What is Keyword in SEO, कीवर्ड म्हणजे काय,Pin

सूची

कीवर्ड म्हणजे काय? (What is Keyword in Marathi)

जेव्हा एखादी व्यक्ती गुगल, बिंग, किंवा अन्य कोणत्याही सर्च इंजिनवर माहिती शोधण्याच्या, प्रश्नाचे उत्तर मिळवण्याच्या, अथवा वस्तू/सेवा खरेदी करण्याच्या उद्देशाने कोणताही शब्द किंवा शब्दसमूह सर्च बॉक्समध्ये टाईप करते किंवा व्हॉइस सर्चसाठी उच्चारते, त्या शब्दास किंवा शब्दसमूहास सर्च क्वेरी असे म्हणतात. 

सर्च क्वेरी म्हणून वापरलेले शब्द, शब्दसमूह किंवा संबंधित शब्द आपल्या संकेतस्थळावरील मजकुरात वापरले  जातात, अशा शब्दांना एसईओ च्या भाषेत कीवर्ड्स (keywords) असे म्हणतात. 

कीवर्ड हा एक शब्द, शब्दसमूह, वाक्य, अथवा प्रश्न या स्वरूपात असू शकतो. अनेक शब्द किंवा शब्दसमूह (phrase) वापरलेले असले तरी सामान्यतः त्यास कीफ्रेज ऐवजी कीवर्ड असेच संबोधले जाते.

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये कीवर्ड हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जर आपले संकेतस्थळ/ब्लॉग सर्च इंजिनमध्ये रँक करायचे असेल, जास्तीत जास्त ऑरगॅनिक ट्रॅफिक (रहदारी) मिळवायचे असेल, आणि ऑनलाईन विक्री वाढवायची असेल, तर योग्य कीवर्ड्स शोधून आपल्या मजकुरात समाविष्ट करणे आवश्यक असते.

कीवर्ड स्टफिंग म्हणजे काय? (What is Keyword Stuffing)

कीवर्ड स्टफिंग म्हणजे अनावश्यक शब्द (keywords) किंवा संख्या (numbers) अतिरिक्त प्रमाणात वापरून आपल्या वेबपेजच्या सर्च इंजिन रँकिंगमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करणे.

कीवर्ड स्टफिंगसाठी प्रामुख्याने खालील तंत्रांचा वापर केला जातो.

  • मजकुरात कीवर्ड्स व संख्या विनाकारण पुनःपुन्हा वापरणे.
  • कोणताही संदर्भ नसलेले कीवर्ड्स मजकुरात समाविष्ट करणे.
  • सांख्यिक माहिती कोणत्याही अतिरिक्त उपयुक्ततेशिवाय मजकुरात समाविष्ट करणे. उदा. दूरध्वनी क्रमांक यादी, परीक्षा क्रमांक यादी, इत्यादी.
  • ज्या शहर किंवा राज्यांसाठी वेबपेज रँक करायचे त्या शहर किंवा राज्यांची यादी वेबपेजवर वारंवार समाविष्ट करणे.

सामान्यतः मजकुरात कीवर्ड्स योग्य ठिकाणी व योग्य प्रमाणात वापरणे महत्त्वाचे असते.

अतिरिक्त प्रमाणात कीवर्ड्स वापरल्यामुळे (keyword stuffing) मजकूर रटाळ व कंटाळवाणा वाटू शकतो.

परिणामतः वाचक आपल्या वेबसाईटपासून दूर जाऊ शकतात किंवा ब्लॉगला अनफॉलो करू शकतात. शिवाय आपले संकेतस्थळ, ब्लॉग, किंवा त्यावरील मजकूर शेअर होण्याचे प्रमाणही घटू शकते.

या गोष्टी टाळण्यासाठी काहीजण अतिरिक्त कीवर्ड्स वाचकांपासून लपवून ठेवतात. उदा. लेखातील फॉन्ट व पार्श्वभूमीसाठी (content background) साठी एकाच रंगाचा वापर करणे, मेटा टॅग्ज किंवा इमेज अल्टरनेटिव्ह टेक्स्ट (alt text) मध्ये कीवर्ड्सचा अतिरेकी वापर करणे.

कीवर्ड स्टफिंगमुळे काही प्रमाणात फायदा होत असेलसुद्धा, परंतु दीर्घकालीन फार नुकसान होण्याची दाट शक्यता असते. उदा. वेबसाईटच्या गुगल रँकिंगवर नकारात्मक परिणाम होणे.

सर्वसाधारणपणे कीवर्ड डेन्सिटी ०.५% ते २% असावी, जेणेकरून कीवर्ड स्टफिंगची समस्या उद्भवणार नाही.

कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय? (What is Keyword Density)

कीवर्ड डेन्सिटी म्हणजे एखादा शब्द एकूण मजकुरात किती प्रमाणात वापरला गेला याची टक्केवारी.

कीवर्ड डेन्सिटी = (कीवर्डमधील शब्दसंख्या x कीवर्डची वारंवारता)/मजकुरातील एकूण शब्दसंख्या

पारंपरिक सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये २% पर्यंत कीवर्ड डेन्सिटी योग्य मानली जाते.

सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व मशीन लर्निंग (ML) आधारित नैसर्गिक भाषा प्रक्रियेसारख्या (NLP) अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सर्च इंजिनद्वारे केला जात असल्यामुळे कीवर्ड डेन्सिटीऐवजी सर्च इंटेंट हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.

त्यामुळे कीवर्ड डेन्सिटी योग्य प्रमाणात हवीच, पण त्यासोबतच आपल्या संकेतस्थळावरील मजकूर माहितीपर, उच्च दर्जाचा, वापरकर्त्यांना उपयुक्त आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शोधकर्त्याच्या हेतूची पूर्तता करणारा असावा.

आणखी वाचा: ब्लॉगसाठी फायदेशीर विषय कसा निवडावा?

कीवर्ड्सचे प्रकार कोणते? (Types of Keywords)

कीवर्ड्सची लांबी, विपणन प्रक्रियेतील कीवर्ड्सची भूमिका, आणि ऑन-पेज ऑप्टिमायझेशनमधील कीवर्ड्सचे महत्त्व यांनुसार कीवर्ड्सचे निरनिराळे प्रकार पडतात.

योग्य ठिकाणी योग्य प्रकारचे कीवर्ड्स वापरल्यामुळे आपल्या मजकुराची गुणवत्ता वाढते, तसेच ऑरगॅनिक ट्रॅफिक, लीड्स, व विक्री यांमध्येही वाढ होऊ शकते.

लांबीनुसार कीवर्ड्सचे प्रकार

सर्वांत प्रथम आपण कीवर्ड्सच्या लांबीनुसार कोणते प्रकार पडतात, याविषयी माहिती घेऊ.

१. शॉर्ट-टेल कीवर्ड्स/आखूड लांबीचे शब्द (Short-Tail Keywords)

शॉर्ट-टेल कीवर्ड्स म्हणजे सर्वसाधारणपणे रोजच्या वापरातील कीवर्ड्स.

शॉर्ट-टेल कीवर्ड्सची लांबी फक्त एक ते दोन शब्दांपर्यंत मर्यादित असते, परंतु या कीवर्ड्ससाठी होणारी प्रतिमाह शोधसंख्या (monthly search volume) खूप जास्त असते.

शॉर्ट-टेल कीवर्ड्सची लोकप्रियता व प्रतिमाह शोधसंख्या जास्त असल्यामुळे, या कीवर्ड्ससाठी रँक करताना मोठया स्पर्धेचा सामना करावा लागतो.

जर आपण नवीन संकेतस्थळ किंवा ब्लॉग सुरु केला असेल, तर सुरुवातीचे काही महिने जास्त स्पर्धा असणारे शॉर्ट-टेल कीवर्ड्स आपल्या मजकुरात टार्गेट करणे शक्यतो टाळावे.

कालांतराने आपण शॉर्ट-टेल कीवर्ड्ससाठी आपली वेबसाईट रँक करण्याबाबत विचार करू शकता.

उदा. smartphone, running shoes, इत्यादी.

२. मिड-टेल कीवर्ड्स/मध्यम लांबीचे शब्द (Mid-Tail Keywords)

मिड-टेल कीवर्ड्समधून शॉर्ट-टेल कीवर्ड्सपेक्षा जास्त माहिती मिळते. त्यामुळे शोधकर्त्याला कोणता परिणाम अपेक्षित आहे याचा सर्वसाधारण अंदाज बांधणे सोपे होते.

मिड-टेल कीवर्ड्समध्ये दोन ते तीन शब्दांचा समावेश होतो.

सामान्यतः मिड-टेल कीवर्ड्ससाठी प्रतिमाह शोधसंख्या (monthly search volume) शॉर्ट-टेल कीवर्ड्सपेक्षा कमी असते, परंतु त्याप्रमाणात स्पर्धा सुद्धा कमी होते.

जर कमी स्पर्धा व जास्त प्रतिमाह शोधसंख्या (monthly search volume) असणारे कीवर्ड्स आपण शोधू शकलात, तर कमी कालावधीत फार मोठ्या प्रमाणावर ऑरगॅनिक ट्रॅफिक, लीड्स, व विक्री साध्य करणे आपल्याला शक्य होईल.

उदा. smartphone under १००००, puma running shoes, इत्यादी.

३. लॉंग-टेल कीवर्ड्स/जास्त लांबीचे शब्द (Long-Tail Keywords)

लॉंग-टेल कीवर्ड्समुळे शोधकर्त्याला कोणता परिणाम अपेक्षित आहे याचा अचूक अंदाज बांधणे आपल्याला शक्य होते. लॉंग-टेल कीवर्ड्समध्ये चार किंवा अधिक शब्द असू शकतात.

सामान्यतः लॉंग-टेल कीवर्ड्ससाठी प्रतिमाह शोधसंख्या (monthly search volume) व स्पर्धा (competition) खूप कमी असल्यामुळे या कीवर्ड्ससाठी आपले संकेतस्थळ रँक करणे तुलनेने सोपे असते.

मजकुरात लॉंग-टेल कीवर्ड्स टार्गेट करण्याचा मुख्य फायदा म्हणजे जरी या कीवर्ड्सद्वारे मिळणारे ऑरगॅनिक ट्रॅफिक कमी असले, तरीही कन्व्हर्जन रेट शॉर्ट-टेल कीवर्ड्स व मिड-टेल कीवर्ड्सपेक्षा जास्त असतो.

ब्लॉगच्या विषयाला अनुरूप व्यावसायिक लॉंग-टेल कीवर्ड्स शोधून आपल्या मजकुरात योग्य प्रकारे टार्गेट केल्यास ब्लॉग महसुलामध्ये भरीव वाढ होऊ शकते.

उदा. best smartphone under १०००० rupees, puma running shoes for women, इत्यादी.

विपणन प्रक्रियेतील भूमिकेनुसार कीवर्ड्सचे प्रकार

१. बाजार श्रेणी कीवर्ड्स (Market Segmentation Keywords)

बाजार श्रेणी कीवर्ड्स उत्पादनाच्या प्रकाराशी/बाजारश्रेणीशी संबंधित असतात.

एखाद्या बाजारातील निरनिराळया प्रकारच्या उत्पादनांची, ब्रँड्सची माहिती मिळवण्यासाठी शोधकर्ते सर्वसाधारणपणे ज्या शब्दांचा वापर करतात, त्यांना बाजार श्रेणी कीवर्ड्स म्हणतात.

उदा. office chair, gaming chair, इत्यादी.

२. ग्राहक श्रेणी कीवर्ड्स (Customer Segmentation Keywords)

ग्राहक श्रेणी कीवर्ड्स ग्राहकांशी संबंधित असतात.

हे कीवर्ड्स ग्राहकांचे वय, लिंग, व्यवसाय, उत्पन्न, धर्म/वंश, खरेदीच्या सवयी इत्यादीनुसार आपली विपणन रणनीती तयार करण्यासाठी वापरले जातात.

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये योग्य ग्राहक श्रेणी कीवर्ड्सचा उपयोग करून संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होते.

उदा. red t-shirts for women, black t-shirts for men, automatic cars for kids under १०, इत्यादी.

३. उत्पादन कीवर्ड्स (Product Keywords)

उत्पादन कीवर्ड्स हे विशिष्ट ब्रॅंडद्वारे तयार केलेल्या उत्पादनाशी निगडित असतात.

जर आपण ब्रँड अवेअरनेस (brand awareness) किंवा लोकसंपर्क मोहीम (PR campaign) राबवत असाल, तर उत्पादन कीवर्ड्स आपल्या वेबसाईटवर, विशेषतः प्रॉडक्ट पेजवर वापरायला विसरू नका.

उदा. iphone १२, mcchicken burger इत्यादी.

४. प्रतिस्पर्धी कीवर्ड्स (Competitors Keywords)

प्रतिस्पर्धी कीवर्ड्स आपल्या प्रतिस्पर्धी व्यवसाय किंवा त्यांच्या एखाद्या ब्रँडशी संबंधित असतात.

प्रतिस्पर्धी कीवर्ड्सचा वापर करून आपल्या प्रतिस्पर्धी व्यवसाय आणि त्यांच्या ब्रँड, उत्पादने, सेवा, व लक्ष्यित ग्राहकांविषयी अधिक माहिती गोळा करणे शक्य होते.

या माहितीचा वापर करून आपण अधिक मजबूत व्यावसायिक रणनीती, विशेषतः एसईओ व जाहिरात रणनीती (SEO and PPC strategy) तयार करू शकता.उदा. रिअलमी या ब्रँडसाठी, redmi budget smartphones किंवा mi android tv इत्यादी प्रतिस्पर्धी कीवर्ड्स असू शकतात.

५. भू-लक्ष्यित कीवर्ड्स (Geo Targeted Keywords)

भू-लक्ष्यित कीवर्ड्स एखाद्या भौगोलिक स्थानाशी निगडित असतात.

याप्रकारचे कीवर्ड्स प्रामुख्याने बहुस्थानीय व्यवसाय, निर्देशिका संकेतस्थळे (directory websites), आणि लोकल एसईओमध्ये वापरले जातात.

उदा. cake shop near me, gaming cafe in pimpri, rto in pune, kolhapur dmart, इत्यादी.

सर्च इंटेंटनुसार कीवर्ड्सचे प्रकार

या भागात सर्च इंटेंट अर्थात शोधकर्त्याच्या हेतूनुसार कीवर्ड्सचे प्रकार कोणते याविषयी माहिती घेऊ. सर्च इंटेंटनुसार कीवर्ड्सचे प्रमुख चार प्रकार पडतात.

१. इन्फर्मेशनल कीवर्ड्स (Informational Keywords)

ज्या कीवर्ड्समागे एखादी व्यक्ती, वस्तू, घटना, इत्यादींबाबत माहिती मिळवण्याचा उद्देश असतो, त्यांना इन्फर्मेशनल कीवर्ड्स असे म्हणतात.

या कीवर्ड्स साठी मिळणारे उत्तर एका शब्दात किंवा संपूर्ण लेखाच्या स्वरूपात असू शकते.

इन्फर्मेशनल कीवर्ड्समध्ये प्रामुख्याने प्रश्नार्थक शब्द आणि सामान्यनाम/विशेषनामांचा वापर केलेला असतो.

उदा. who is the prime minister of india, blogging, coronavirus symptoms, इत्यादी.

२. नेव्हिगेशनल कीवर्ड्स (Navaigational Keywords)

नेव्हिगेशनल कीवर्ड्स एखादी विशिष्ट वेबसाईट किंवा ब्रँड यांचा शोध घेण्यासाठी वापरले जातात.

ज्या वेबसाईट्स खूप कालावधीपासून सर्च इंजिनमध्ये इंडेक्स आहेत व त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे, अशा वेबसाईट्सचा संपूर्ण पत्ता लिहीत बसण्यापेक्षा नेव्हिगेशनल कीवर्ड्स वापरून सहजपणे संबंधित वेबसाईट्सवर पोहोचणे शक्य असते.

नेव्हिगेशनल कीवर्ड्सना ब्रँडेड कीवर्ड्स असेसुद्धा म्हटले जाते.

उदा. instagram, pizzahut, amazon, इत्यादी.

३. कमर्शिअल इन्वेस्टीगेशन कीवर्ड्स (Commercial Investigation Keywords)

कमर्शिअल इन्वेस्टीगेशन कीवर्ड्स कोणतीही वस्तू अथवा सेवा विकत घेण्यापूर्वी आपल्या निर्णयाचे अवलोकन करण्यासाठी वापरले जातात.

कमर्शिअल इन्वेस्टीगेशन कीवर्ड्स वापरणाऱ्या शोधकर्त्यास योग्य मार्गदर्शन केल्यास कन्व्हर्जन रेट मध्ये भरघोस वाढ होऊ शकते.

अशा कीवर्ड्समध्ये तुलनात्मक, विश्लेषणात्मक शब्द प्रामुख्याने वापरले जातात.

उदा. redmi mi 10i vs. oneplus nord, best fitness band in india, top tourist places in maharashtra, canon 80d review, इत्यादी.

४. ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स (Transactional Keywords)

ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स वापरणाऱ्या शोधकर्त्याने आपल्याला कोणती वस्तू/सेवा विकत घ्यायचे आहे, हे निश्चित केलेले असते.

फारतर ते किंमत, कुपन किंवा सूट यांसारखे कीवर्ड मॉडीफायर्स वापरून अपेक्षित वस्तू/सेवा स्वस्तात कशी मिळेल याचा प्रयत्न करू शकतात.

संभाव्य महसूल लक्षात घेता लोकप्रिय ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्ससाठी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा असते. अशा कीवर्ड्ससाठी आपले संकेतस्थळ किंवा ब्लॉग रँक करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

उदा. buy apple watch, cheap air fryer on amazon, elementor pro discount coupon, hyperx cloud 2 price, इत्यादी.

लेखातील भूमिकेनुसार /ऑन-पेज ऑप्टिमायझेशननुसार कीवर्ड्सचे प्रकार

या भागात लेखातील भूमिकेनुसार/ऑन-पेज ऑप्टिमायझेशननुसार कीवर्ड्सचे प्रकार कोणते, याबाबत माहिती घेऊ.

१. प्राथमिक कीवर्ड (Primary Keyword)

पारंपरिक एसईओ प्रक्रियेमध्ये प्राथमिक कीवर्डला खूप महत्त्व दिले जाते.

त्यामुळे प्राथमिक कीवर्ड शीर्षक, परमालिंक, मेटा डिस्क्रिप्शन, उपशीर्षके, मजकुराचा महत्त्वाचा भाग, इमेज अल्ट टेक्स्ट इत्यादी ठिकाणी वापरला जातो.

सर्वसाधारणपणे प्राथमिक कीवर्डची डेन्सिटी ०.५% ते २% असावी असे गृहीतक आहे.

एसईओ प्रक्रियेमध्ये प्राथमिक कीवर्डसाठी प्रतिमाह शोधसंख्या व कन्व्हर्जन रेट जास्तीत जास्त असावा आणि स्पर्धा तुलनात्मकदृष्ट्या कमी असावी, जेणेकरून संबंधित कीवर्ड जलद रँक होईल व खूप ऑरगॅनिक ट्रॅफिक मिळवणे शक्य होईल.

जर आपल्याला लीड जनरेशन किंवा वस्तू/सेवांची विक्री अपेक्षित असेल, तर व्यावसायिक (खरेदी/विक्री संबंधित) कीवर्ड्स टार्गेट करणे आवश्यक असते.

२. दुय्यम कीवर्ड्स (Secondary Keywords)

प्राथमिक कीवर्डशी संबंधित कीवर्ड्सना (related keywords) दुय्यम कीवर्ड्स असे संबोधले जाते.

एकाच लेखात एक किंवा अधिक दुय्यम कीवर्ड्स टार्गेट केले जाऊ शकतात.

दुय्यम कीवर्ड्सची प्रतिमाह शोधसंख्या, स्पर्धा, सीपीसी (cost per click) प्राथमिक कीवर्डपेक्षा कमी-जास्त असू शकते.

वारंवार प्राथमिक कीवर्ड वापरण्याऐवजी दुय्यम कीवर्ड्स वापरल्यामुळे मजकूर नीरस वाटत नाही.

आजमितीला गुगल कीवर्ड प्लॅनर, सेमरश, कीवर्डटूल.आयओ, आणि गुगल ऑटोकंप्लिटसारख्या साधनांचा वापर करून दुय्यम/संबंधित कीवर्ड्स शोधणे सहज शक्य आहे.

३. एलएसआई कीवर्ड्स (LSI Keywords)

एलएसआई कीवर्ड्स (Latent Semantic Indexing Keywords) म्हणजे सुप्तपणे संदर्भ साधणारे शब्द/शब्दार्थ.

उदा. apple या शब्दाशी fruit, jam, cyder vinegar, red यासोबतच iPhone, Watch, iCloud, smartphone, selfie हे शब्दसुद्धा संबंधित आहेत.

परंतु apple हे फळ समजून मजकूर लिहिला असेल तर fruit, jam, cyder vinegar, red हे शब्द जास्त सुसंगत वाटतात.

त्याचप्रमाणे apple ही तंत्रज्ञान कंपनी आहे असे विचारात घेऊन मजकूर लिहिला असेल तर iPhone, Watch, iCloud, smartphone, selfie हे शब्द जास्त सुसंगत वाटतात.

एकूणच काय तर एका शब्दाशी संबंधित/सुप्तपणे संदर्भ साधणारे शब्दार्थ वापरून मजकूरातील एखाद्या घटकांबद्दल कल्पना येऊ शकते.

हाच एलएसआई कीवर्ड्स या संकल्पेनेचा गाभा आहे.

गुगल सार्वजनिकरित्या हा सिद्धांत मानायला नकार देते.

काहीही असो, एलएसआई कीवर्ड्स आपला मजकूर अधिक अर्थपूर्ण व वाचनीय बनवतात हे मात्र नक्की.

सारांश

या लेखात आपण कीवर्ड म्हणजे काय, कीवर्ड स्टफिंग, कीवर्ड डेन्सिटी, आणि कीवर्ड्सचे निरनिराळे प्रकार यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. हा लेख आपल्याला आवडला असेल तर टिपण्णीद्वारे आम्हांला कळवा तसेच आपल्या मित्रांसोबतही शेअर करा.

आणखी वाचा: मराठी संकेतस्थळासाठी कीवर्ड रिसर्च कसे करावे?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *