What is Web Hosting in Marathi (वेब होस्टिंग म्हणजे काय)Pin

या लेखात आपण वेब होस्टिंग म्हणजे काय? (What is Web Hosting in Marathi) वेब होस्टिंगचे प्रकार कोणते? (Types of Web Hosting) आणि वेब होस्टिंग खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? इत्यादी गोष्टींबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत.

सर्वांत प्रथम आपण वेब होस्टिंग म्हणजे काय हे पाहू.

वेब होस्टिंग म्हणजे काय (What is Web Hosting in Marathi)

कोणतेही संकेतस्थळ किंवा ब्लॉग तयार करण्यासाठी आपल्याला इंटरनेटवर मजकूर, प्रतिमा, व्हिडिओज किंवा अन्य स्वरूपातील माहिती शेअर करावी लागते.

ही माहिती इंटरनेटवर साठवून ठेवण्यासाठी वापरली जाणारी जागा म्हणजे वेब होस्टिंग.

वेब होस्टिंग हा सुद्धा एक संगणक असतो जो आंतरजालासोबत सदैव जोडलेला असतो.

परंतु वेब होस्टिंग सेवा माहितीची साठवणूक करण्यापुरती मर्यादित नसते.

जेव्हा वापरकर्ता आपल्या वेबपेजचा पत्ता (URL) त्याच्या ब्राऊझरमध्ये टाईप करतो आणि एन्टर बटण प्रेस करतो, त्यावेळी जर वापरकर्ता इंटरनेटसोबत जोडलेला असेल, तर वेब होस्टिंगद्वारे संबंधित वेबपेज वापरकर्त्याला दाखवले जाते.

आणखी वाचा: डोमेन म्हणजे काय? डोमेनची खरेदी कशी करावी?

वेब होस्टिंगचे प्रकार कोणते? (Types of Web Hosting)

होस्टिंगचे प्रामुख्याने ४ प्रकार पडतात.
१. शेअर्ड होस्टिंग
२. क्लाऊड होस्टिंग
३. व्हीपीएस होस्टिंग
४. डेडीकेटेड होस्टिंग

१. शेअर्ड होस्टिंग (Shared Hosting)

शेअर्ड होस्टिंग या प्रकारच्या वेब होस्टिंग सेवेमध्ये एका सर्व्हर अनेक वापरकऱ्यांमध्ये शेअर केला जातो. ज्या वेबसाईट्स तुलनेने लहान असतात किंवा ज्यांना कमी संसाधनांची (Resources) ची गरज असते, अशा वेबसाईट्स साठी शेअर्ड होस्टिंग विकत घेणे अत्यंत फायदेशीर असते.

एकच सर्व्हर अनेक वेबसाईट्सद्वारे वापरात असल्यामुळे शेअर्ड होस्टिंग सेवा कमी दरात उपलब्ध असते.

गुणवत्ता व ग्राहक सेवा यांनुसार शेअर्ड होस्टिंगची किंमत ₹५० ते ₹५०० प्रतिमाह इतकी असू शकते.

बहुतांश कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यासाठी पहिल्या खरेदीवर २०% ते ९९% इतकी सूट देतात. परंतु फक्त किंमत पाहून वेब होस्टिंग खरेदी केल्यास भविष्यात काही समस्या निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे हा लेख पूर्ण वाचूनच कोणती वेब होस्टिंग सेवा विकत घ्यावी याबाबत निर्णय घ्या. किंवा आम्ही शिफारस केलेल्या वेब होस्टिंग सेवा विकत घेण्याबद्दलही आपण विचार करू शकता.

आम्ही शिफारस केलेल्या शेअर्ड वेब होस्टिंग सेवा (Our Recommended Shared Hosting Services):

२. क्लाऊड होस्टिंग (Cloud Hosting)

क्लाऊड होस्टिंग साधारण शेअर्ड होस्टिंगपेक्षा थोडी वेगळी असते. या प्रकारच्या वेब होस्टिंग सेवेमध्ये आपली माहिती (Data) एकाच फिजिकल सर्व्हरवर साठवून ठेवण्याऐवजी संगणकीय क्लाऊडमध्ये साठवली जाते व इंटरनेटद्वारे ऍक्सेस केली जाते.

संगणकीय क्लाऊड हा अनेक संगणकाचा आभासी समूह असतो, जो संपूर्ण एका फिजिकल सर्व्हरप्रमाणे कार्य करतो.

सर्वसाधारण शेअर्ड होस्टिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास संबंधित सर्व्हरवरील सर्व वेबसाईट्स (संकेतस्थळे) निष्क्रिय होतात.

याउलट क्लाऊड होस्टिंग सेवेमध्ये आपली माहिती अनेक आभासी सर्व्हरवर साठवली असल्यामुळे एका व्हर्चुअल सर्व्हरमध्ये बिघाड असतानाही वेबसाईट्स सुरु ठेवता येतात.

याशिवाय जास्त वेब ट्रॅफिक (रहदारी) आल्यास आवश्यकतेनुसार अधिक संसाधने प्राप्त करणे शक्य होते.

वेब होस्टिंग व्यवस्थापन न करता येणाऱ्या व्यक्तींसाठी मॅनेज्ड क्लाऊड होस्टिंग सेवा सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत.

यामध्ये वेब होस्टिंग कंपनी आपल्या वेब होस्टिंगचे व्यवस्थापन करतेच शिवाय आपल्या वेबसाईटची सुरक्षा, अपटाइम/वेग वाढवण्याची करावे लागणारे बदल, बॅकअप्स/रिस्टोअर्स इत्यादीसंबंधित तांत्रिक साहाय्य प्रदान करते.

आम्ही शिफारस केलेल्या क्लाऊड वेब होस्टिंग सेवा (Our Recommended Cloud Hosting Services):

३. व्हीपीएस होस्टिंग (VPS Hosting)

व्हीपीएस (VPS) अर्थात व्हर्चुअल प्रायव्हेट सर्व्हर. या प्रकारच्या होस्टिंग सेवेमध्ये एका सर्व्हरला ठराविक भागांमध्ये विभागले जाते व प्रत्येक वापरकर्त्याला त्याचा स्वतंत्र भाग वापरण्यास दिला जातो.

अर्थातच व्हीपीएस होस्टिंग सेवेमध्ये प्रत्येक सर्व्हरवर वापरकर्त्यांची संख्या शेअर्ड होस्टिंगच्या तुलनेने कमी असते.

ज्या संकेतस्थळांसाठी अधिक संसाधनांची आवश्यकता आहे किंवा जास्त वेब ट्रॅफिक (रहदारी) आहे, त्या संकेतस्थळांसाठी व्हीपीएस होस्टिंग वापरणे श्रेयस्कर ठरते.

सामान्यतः व्हीपीएस होस्टिंगची किंमत मात्र शेअर्ड होस्टिंगपेक्षा जास्त असते. परंतु आपल्याला डेडीकेटेड सर्व्हर रिसोर्सेस (उदा. रॅम, सीपीयु), अतिरिक्त सुरक्षा, आणि संपूर्ण नियंत्रण प्राप्त होते.

व्हीपीएस होस्टिंग सेवा विकत घेण्यासाठी ₹४०० ते ₹७५०० प्रतिमाह किंवा सर्व्हर कॉन्फिगरेशननुसार अधिक खर्च येऊ शकतो.

४. डेडीकेटेड होस्टिंग (Dedicated Hosting)

डेडीकेटेड होस्टिंग म्हणजे एक किंवा अधिक फिजिकल सर्व्हर्स एका विशिष्ट ग्राहकासाठी समर्पित केलेले असतात. प्रामुख्याने खूप रहदारी असणाऱ्या व्यावसायिक संकेतस्थळांसाठी डेडीकेटेड होस्टिंग सेवेचा वापर केला जातो.

संपूर्ण सर्व्हर विकत घेतल्यामुळे डेडीकेटेड होस्टिंगमध्ये ग्राहकांना अत्युच्च्य नियंत्रण प्राप्त होते. परंतु त्यासोबतच सर्व्हरची सुरक्षा, बॅकअप्स, व्यवस्थापन, आणि परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन या सर्वांची जबाबदारी ग्राहकाची असते.

ग्राहक आपल्या गरजेनुसार सर्वोत्तम कामगिरीसाठी सर्व्हर कॉन्फिगरेशनमध्ये बदल करू शकतो.

डेडीकेटेड होस्टिंगची किंमत मात्र सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर असते. एका उत्तम प्रतीच्या डेडिकेटेड सर्व्हरसाठी महिन्याकाठी ₹१०,००० ते लाखो रुपये मोजावे लागू शकतात.

योग्य वेब होस्टिंग सेवा कशी निवडावी? (How to Choose the Right Web Hosting Service)

आपण किती माहिती आपल्या संकेतस्थळावर अपलोड करणार आहात? आपल्या संकेतस्थळाला अंदाजे किती व्यक्ती भेट देतात? आपल्याला आवश्यक असणाऱ्या तांत्रिक गोष्टी कोणत्या? यानुसार योग्य वेब होस्टिंग सेवा निवडता येणे अत्यंत आवश्यक आहे.

या भागात आपण आपल्या वेबसाईटसाठी योग्य होस्टिंग सेवा कशी निवडावी याबाबत माहिती घेऊ.

१. उपलब्ध माहिती साठवणूक क्षमता व बँडविड्थ (Storage Space and Bandwidth)

आपण तयार करत असलेली वेबसाईट किंवा ब्लॉगचा आवाका किती असू शकेल, त्यासाठी लागणारी माहिती साठवणूक क्षमता व बँडविड्थ किती असावी याचा सारासार विचार वेब होस्टिंग सेवा विकत घेण्यापूर्वी करावा.

याखेरीज माहिती साठवणुकीसाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते हेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. उदा. एसएसडी होस्टिंग (SSD Hosting) हे पारंपरिक एचडीडी होस्टिंग (HDD Hosting) पेक्षा किमान दुप्पट वेग प्रदान करते.

आपण ऑन साईट बॅकअप्स किंवा स्टेजिंग यासारख्या फीचर्सचा वापर करणार असाल, तर संबंधित वेब होस्टिंग प्लॅन मध्ये उपलब्ध असणारी माहिती साठवणूक क्षमता पुरेशी आहे का? याचादेखील विचार करा.

लहान आणि कमी रहदारी असणाऱ्या वेबसाईट्स साठी शेअर्ड होस्टिंग चांगला पर्याय आहे ज्यामध्ये १ जीबी ते ४० जीबी इतकी माहिती साठवणूक क्षमता प्रदान केलेली असते.

अधिक रिसोर्सेस ची आवश्यकता भासल्यास आपण क्लाऊड होस्टिंग किंवा व्हीपीएस होस्टिंग चा वापर करू शकता.

लक्षात घ्या अनलिमिटेड स्टोरेज आणि बँडविड्थ ही विपणन अधिक प्रभावी करण्यासाठी वापरलेली क्लुप्ती (marketing gimmick) आहे.

प्रत्यक्षात एका ठराविक मर्यादेनंतर अनलिमिटेड होस्टिंग वर होस्ट केलेल्या वेबसाईट्सची गती अत्यंत कमी होते.

प्रत्येक वेब होस्टिंग कंपनी अनलिमिटेड होस्टिंग सेवेबाबत फेअर युज पॉलिसी (FUP) अवलंबत असते, ज्याबाबत अधिक माहिती संबंधित वेब होस्टिंग कंपनीच्या टर्म्स आणि कंडिशन्स पेजवर किंवा एफएक्यू (FAQ) पेजवर नमूद केलेली असते.

२. वेब होस्टिंग फीचर्स (Features)

साठवणूक क्षमता आणि बॅण्डविड्थ सोडून इतर फीचर्ससुद्धा वेब होस्टिंग सेवेचा भाग असतात. ज्यामध्ये ई-मेल सेवा, बॅकअप्स, मालवेअर स्कॅनिंग व रिमूव्हल, सहज वापरता येण्याजोगे कंट्रोल पॅनेल, मोफत सुरक्षा प्रमाणपत्रे, स्क्रिप्ट/ॲप्लिकेशन ऑटो-इंस्टॉलर, पेज बिल्डर, कॅचिंग यंत्रणा इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

आपण विकत घेत असलेल्या वेब होस्टिंग प्लॅनमध्ये आपल्याला वरीलपैकी कोणती फीचर्स मिळत आहे, याचा अभ्यास करूनच योग्य निर्णय घ्या.

३. स्पीड आणि परफॉर्मन्स टेक्नोलॉजीज (Speed and Peformance Technologies)

आपले संकेतस्थळ जलद लोड होणे गरजेचे असते. अन्यथा बाऊन्स रेट वाढणे, पोगोस्टीकिंग, वेबसाईट रँकिंगमध्ये उतार इत्यादी परिणामांना सामोरे जावे लागते.

वेब होस्टिंग सेवा आपल्या संकेतस्थळाच्या वेगामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

एसएसडी साठवणूक (SSD Storage), ऑपरेटिंग सिस्टम (OS) व अन्य सॉफ्टवेअर्सच्या नवीनतम आवृत्ती, जलद इंटरनेट जोडणी, कॅचिंग यंत्रणा, HTTP/२ किंवा HTTP/३, QUIC, आणि कन्टेन्ट डिलिव्हरी नेटवर्क (CDN) द्वारे संकेतस्थळ लोड होण्याचा वेग वाढवता येतो.

ज्यावेळी आपण वेब होस्टिंग सेवा खरेदी कराल, त्यावेळी वरील मुद्द्यांचा नक्की विचार करा.

४. सुरक्षा (Security)

कोणत्याही कारणास्तव जर आपली वेबसाईट हॅक झाली किंवा त्यामध्ये संगणकीय व्हायरस आला, तर आपल्या व्यवसायाचे अतोनात नुकसान होऊ शकते.

त्यामुळे आपल्या संकेतस्थळावरील माहिती (Website Data) आणि एकूणच होस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरची सुरक्षा याबाबत खात्रीशीर उपाययोजना असणाऱ्या वेब होस्टिंग सेवेचा वापर करणे केव्हाही उत्तम.

सद्यस्थितीत बहुतांश वेब होस्टिंग कंपन्या वेबसाईट्ससाठी मोफत सुरक्षा प्रमाणपत्र (SSL certificate), वेब ॲप्लिकेशन फायरवॉल, डीडीओएस संरक्षण (DDoS Protection), हॅक/मालवेअर रिमूव्हल इत्यादी सुविधा प्रदान करतात.

जे व्यवसाय आपल्या वेबसाईट्सवर ग्राहकांसाठी डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट सुविधा उपलब्ध करून देतात (विशेषतः ई-कॉमर्स वेबसाईट्स), अशा वेबसाईट्ससाठी PCI DSS (Payment Card Industry Data Security Standard) मान्यताप्राप्त असणे अनिवार्य असते. काही नामांकित वेब होस्टिंग कंपन्या ही सुविधासुद्धा उपलब्ध करून देतात.

जर संकेतस्थळाच्या सुरक्षेबाबत आपल्याला कोणतीही तडजोड करायची नसेल, तर डब्ल्यूपीएक्स होस्टिंग (WPX Hosting) आणि किंस्टा (Kinsta) हे दोन उत्तम वेब होस्टिंग पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत.

५. सर्व्हर लोकेशन (Server Location)

वापरकर्ता आणि सर्व्हर यांमधील अंतर जास्त असल्यास लेटन्सी जास्त असते.

लेटन्सी म्हणजे वापरकर्त्याची क्रिया आणि सर्व्हरकडून येणारी प्रतिक्रिया यामध्ये होणारा विलंब.

खाली दिलेल्या इमेजवरून लेटन्सी म्हणजे काय याची आपल्याला कल्पना येऊ शकेल.

What is Latency, लेटन्सी म्हणजे कायPin
लेटन्सी म्हणजे काय (What is Latency)

लेटन्सी कमी करण्यामध्ये नेटवर्क इन्फ्रास्टक्चरमध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानासोबतच सर्व्हर लोकेशनची महत्त्वाची भूमिका असते.

वेब होस्टिंग सर्व्हर आणि संभाव्य वापरकर्ते यांमधील अंतर कमी असेल तर त्यांच्यासाठी आपले संकेतस्थळ जलद लोड होईल. परिणामतः वेगासंबंधित समस्या कमी करून वापरकर्त्यांना अधिक समृद्ध अनुभव देणे आपल्याला शक्य होईल.

त्यामुळे संभाव्य वापरकर्त्यांच्या जवळ सर्व्हर लोकेशन असणारी वेब होस्टिंग सेवा निवडणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकेल.

उदा. जर आपल्या वेबसाईटचे जास्तीत जास्त वापरकर्ते भारतात असतील तर मुंबई किंवा बंगलोर डेटासेंटर निवडणे अमेरिका किंवा युरोपमधील डेटासेंटर निवडण्यापेक्षा अधिक योग्य निर्णय ठरेल.

कन्टेन्ट डिलिव्हरी नेटवर्क (CDN) द्वारे लेटन्सी काही प्रमाणात कमी करता येत असेल तरीही डायनॅमिक वेबसाईट्ससाठी वापरकर्त्यांच्या जवळ सर्व्हर लोकेशन असणे केव्हाही चांगले.

६. ग्राहक साहाय्य (Customer Support)

वेब होस्टिंग सेवा खरेदी करण्यापासून ते वेबसाईट्स संबंधित तक्रारींचे निवारण करणे यासाठी २४/७ तास ग्राहक साहाय्य (customer support) उपलब्ध असणे गरजेचे असते, विशेषतः ज्या व्यक्तींना वेब होस्टिंगच्या तांत्रिक बाजूबद्दल फारशी माहिती नसते.

याशिवाय कस्टमर सपोर्ट प्रतिनिधी आपल्याला वेबसाईट तयार करणे, सुरक्षा, परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन, वेबसाईटचे स्थलांतर (website migration), बॅकअप्स, ई-मेल सेवा, इत्यादी गोष्टींमध्ये तसेच अनपेक्षित येणाऱ्या तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी मदत करतात.

बहुतांश कंपन्या २४/७ तास जलद ग्राहक सेवा देण्याचे आश्वासन देतात, परंतु त्यांच्यापैकी मोजक्याच कंपन्या वेळेवर तांत्रिक साहाय्य प्रदान करतात.

त्यामुळे फसव्या मार्केटिंग डावपेचांना भुलून वेब होस्टिंग सेवा विकत घेण्यापेक्षा अभ्यासपूर्ण विचाराअंती योग्य वेब होस्टिंग पर्याय निवडणे केव्हाही हितावह ठरेल.

आपल्या सोयीनुसार लाईव्ह चॅट, दूरध्वनी, ई-मेल, सपोर्ट तिकीट, नॉलेजबेस, ब्लॉग, फोरम्स, आणि सोशल मीडिया यांपैकी कोणते ग्राहक साहाय्य पर्याय उपलब्ध आहेत याची खातरजमा करून घ्या.

एखाद्या वेब होस्टिंग कंपनीचा कस्टमर सपोर्ट एक्सपीरियन्स कसा आहे ते जाणून घ्यायचा असेल तर लोकप्रिय रिव्ह्यू वेबसाईट्स, सोशल मीडिया ग्रुप्स, फोरम्स, आणि संबंधित वेब होस्टिंग कंपनीचे विद्यमान ग्राहक हे आपल्याला खूप मदत करू शकतात.

७. किंमत (Price)

कमी खर्चिक व कामचलाऊ वेब होस्टिंग सेवा निवडावी कि उत्तम दर्जाची प्रीमियम श्रेणीतील वेब होस्टिंग सेवा निवडावी हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असतो.

जर वेब होस्टिंग म्हणजे काय आणि वेब होस्टिंग कसे कार्य करते हे समजून घेतले असेल, तर या प्रश्नाचे उत्तर शोधणे सोपे होईल.

वेब होस्टिंग आपल्या वेबसाईटवरील माहिती साठवून ठेवते आणि वापरकर्त्यांच्या विनंतीनुसार योग्य माहिती उपलब्ध करून देते.

ही प्रक्रिया व्यवस्थित चालू राहण्यासाठी होस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर, सॉफ्टवेअर लायसन्सेस, माहिती व डेटासेंटरची सुरक्षा, अग्निशमन यंत्रणा, वेगवान इंटरनेट जोडणी, कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ, कायदेशीर बाबी, विपणन, कस्टमर सपोर्ट यांसारख्या गोष्टींवर प्रचंड खर्च होतो.

वरील कारणांस्तव अत्यंत कमी किंमतीमध्ये उत्तम दर्जाची वेब होस्टिंग सेवा पुरवणे थोडे अवघड असते.

त्यामुळे आपण जी वेब होस्टिंग सेवा वापरतो, त्याचे योग्य मूल्य आपण देतो का याचा विचार करावा.

काही कंपन्या सुरुवातीच्या काळात एकूण विक्री किंमतीवर १०% ते ९९% सूट देतात. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना आपली वेब होस्टिंग सेवा विकणे हा यामागचा मुख्य हेतू असतो.

मात्र १-३ वर्षे किंवा ऑफर कालावधी संपल्यानंतर आपल्याला वेब होस्टिंग मूळ किंमतीमध्येच विकत घ्यावी लागते.

याशिवाय अतिरिक्त सेवा व संसाधने विकून वेब होस्टिंग कंपन्या अधिक फायदा कमावतात. उदा. सुरक्षा प्रमाणपत्रे, ऑफ साईट बॅकअप्स, पेज बिल्डर्स, थर्ड-पार्टी सुरक्षा सेवा, डोमेन रेजिस्ट्रेशन्स, कन्टेन्ट डिलिव्हरी नेटवर्क (CDN), कस्टमायझेशन सपोर्ट, एसईओ व अन्य डिजिटल मार्केटिंग सेवा.

या सेवा व संसाधनांची आवश्यकता नसेल तर वेब होस्टिंगसाठी आपल्याला कमी खर्च येईल.

जर आपण वेब होस्टिंग विकत घेण्याच्या विचार करत असाल, तर सुरुवातीच्या काळात शेअर्ड होस्टिंग सेवा उत्तम काम पर्याय आहे, ज्यासाठी प्रतिमाह ₹५० ते ₹५०० किंमत मोजावी लागू शकते.

आपल्या वेबसाईटला खूप विझिटर्स भेट द्यायला लागले की मात्र आपण उत्तम दर्जाच्या क्लाऊड होस्टिंग किंवा व्हीपीएस होस्टिंग सेवेचा विचार करावा.

एकूणच वेबसाईटसाठी आवश्यक संसाधने, वेबसाईटचा प्रकार आणि वेबसाईटचे आपल्या ऑनलाईन व्यवसायातील महत्त्व यांनुसार योग्य पर्याय आपण निवडू शकता.

बहुतांश वेब होस्टिंग कंपन्या ३० दिवसांची मनी बॅक गॅरंटी देतात. त्यामुळे एखादी कंपनी खरोखरच उत्कृष्ट दर्जाची वेब होस्टिंग सेवा पुरवते की ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसते हे लक्षात येईल.

जर संबंधित कंपनी उत्कृष्ट दर्जाच्या सुरक्षेसह वेगवान वेब होस्टिंग सेवा आणि जलद ग्राहक साहाय्य प्रदान करत असेल तर ३० दिवसानंतरही ते सेवा वापरणे सुरु ठेवू शकता.

८. विश्वसनीयता (Uptime Reliability)

कितीही वेगवान आणि सुरक्षित असणारी वेब होस्टिंग सेवा जर दिवसातील काही काळ कार्यरत नसेल, तर व्यावसायिकदृष्ट्या खूप नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे विश्वसनीय वेब होस्टिंग सेवाच खरेदी करावी.

१००% अपटाईम प्रदान करणे प्रत्यक्षात संभव नाही.

अनपेक्षित तांत्रिक अडचणी, ठराविक मर्यादेपेक्षा जास्त लोकांनी एकाच वेळी वेबसाईटला भेट देणे, आणि नियोजित देखभाल उपक्रम यामुळे काही काळ वेबसाईट बंद राहू शकते. मात्र इतर वेळी आपली वेबसाईट योग्य रीतीने कार्य करणे अपेक्षित असते.

कोणत्याही वेब होस्टिंग कंपनीने कमीत कमी ९९.९% अपटाईम प्रदान करणे गरजेचे असते, अन्यथा इतर पर्यायांचा विचार केलेला बरा.

लोकप्रिय रिव्ह्यू पोर्ट्लस, सोशल मीडिया समुदाय, आणि स्वतंत्र रिव्ह्यू ब्लॉग्जवरील इतर वापरकर्त्यांचे अनुभव वाचून आपल्याला संबंधित वेब होस्टिंग कंपनीच्या अपटाईम विश्वसनीयतेचा अंदाज बांधता येईल.

सारांश

या लेखामध्ये आपण वेब होस्टिंग म्हणजे काय (What is Web Hosting in Marathi), वेब होस्टिंग कार्य कसे करते, वेब होस्टिंग निरनिराळे प्रकार कोणते, आणि योग्य वेब होस्टिंग सेवेची निवड कशी करावी याविषयी माहिती घेतली.
जर आपल्याला वेब होस्टिंग संदर्भात कोणतीही समस्या असेल तर आपण टिपण्णीद्वारे आम्हाला कळवू शकता.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *