How to Make Money From Home with Mobile in MarathiPin

सूची

तुमच्या मोबाईलचा वापर करून घरबसल्या पैसे कसे कमवावे? (How to Make Money From Home with Mobile in Marathi)

तुम्ही एक गृहिणी, निवृत्त व्यक्ती, कॉलेजला जाणारे विद्यार्थी किंवा सुशिक्षित बेरोजगार आहात का? फावल्या वेळात काम करून काही अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची तुमची इच्छा आहे, परंतु फार मोठी गुंतवणूक करायची तयारी नाही, अशा परिस्थितीत तुम्ही आहात का? 

चला तर मग, तुमच्या मोबाईल/लॅपटॉप आणि इंटरनेटचा वापर करून घरबसल्या पैसे कसे कमवायचे याविषयी या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. (How to Make Money From Home with Mobile in Marathi) 

लक्षात घ्या, या लेखामध्ये नेटवर्क मार्केटिंग/चेन मार्केटिंग (एकाखाली तीन जोडा, मग तुमचा चेक येईल) किंवा आमच्याकडे सुरुवातीला १००,००० रुपये गुंतवा आणि दरमहा हमखास १२,००० मिळवा, असल्या फसव्या योजनांचा समावेश केलेला नाही.

जर व्यवसायाची मूलभूत तत्त्वे जाणून घेऊन, मेहनत करण्याची तुमची इच्छा नसेल, तर यापुढे अजिबात वाचू नका. याउलट तुम्ही ठाम निर्धार केलात आणि हा लेख मनापासून वाचलात, तर योग्य प्रशिक्षण, निरंतर मेहनत, आणि थोडीशी गुंतवणूक (वेळ आणि पैसा) यांच्या साहाय्याने नवीन व्यवसाय स्थापन करू शकता किंवा तुमच्या सध्याच्या ऑफलाईन व्यवसायाला ऑनलाईन आणून अजून जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता.

यशस्वी होण्यासाठी योग्य मनस्थिती तयार करणे  (Building the Right Mindset for Success)

सर्वप्रथम, यशस्वी होण्यासाठी आपल्या मनाची योग्य तयारी करणे आवश्यक आहे. घरातून पैसा कमवणे म्हणजे झटपट श्रीमंत होणे नाही. सुरुवातीला कमी उत्पन्न मिळेल, परंतु हळूहळू अक्कलहुशारीने आणि योग्य दिशेने निष्ठापूर्वक काम ते उत्पन्न वाढवता येते. मात्र त्यासाठी सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि नैतिक मार्गाने प्रगती साधण्याची वृत्ती असली पाहिजे.

लक्षात घ्या, इंटरनेटच्या दुनियेत यशस्वी होण्यासाठी खालील गोष्टी अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे.

  • दीर्घकालीन दृष्टिकोन (Long-Term Perspective): घरबसल्या पैसा कमवण्यासाठी योग्य प्रशिक्षण, पुरेसा वेळ आणि मेहनतीमध्ये सातत्य असणे महत्त्वाचे असते. त्यामुळे काहीही काम न करता किंवा कोणतेही शिक्षण/कौशल्य आत्मसात केल्याशिवाय झटपट श्रीमंत होण्याचे आश्वासन देणाऱ्या योजनांपासून दूर राहा.
  • निरंतर शिक्षण (Continuous Learning): यशस्वी होण्यासाठी सतत नवीन कौशल्ये शिकणे आणि तुमच्या निवडलेल्या क्षेत्रातील नवीन ट्रेंड्सशी सुसंगत राहणे आवश्यक आहे. शिक्षणाशिवाय प्रगती होत नाही. 
  • गुणवत्ता महत्त्वाची (Quality Matters): तुमच्या सेवा किंवा उत्पादनाची गुणवत्ता चांगली असल्यासच तुम्ही बाजारात टिकून राहू शकाल. किंमत कमी करून स्पर्धामक बाजारात स्वतःची ओळख करणे हे सोपे वाटत असले, तरी भविष्याचा विचार करता वस्तू किंवा सेवांची गुणवत्ता हाच तुमच्या व्यवसायाचा प्रमुख निकष असावा. 
  • ग्राहकांशी चांगले संबंध (Good Customer Relationships): तुमच्या ग्राहकांशी चांगले संबंध निर्माण करणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे दीर्घकालीन यशासाठी आवश्यक आहे. आनंदी ग्राहक तुमच्या वस्तू किंवा सेवा पुन्हापुन्हा खरेदी करतात, त्यांच्या अनुभवाविषयी इतरांना सांगतात, परिणामी तुमचा व्यवसाय झपाटयाने वाढतो. 

नोकरी किंवा व्यवसाय? (Job vs. Business)

तुमच्या मोबाईल/लॅपटॉपचा वापर करून घरबसल्या पैसे कमावण्याचा जो मार्ग तुम्ही निवडणार आहात, तो नोकरीसदृश्य आहे की संपूर्णतः व्यवसाय आहे, हे ठरवणे महत्त्वाचे आहे.

  • नोकरी (Job): एखाद्या कंपनीसाठी नियमित काम करणे किंवा फ्रिलांसिंग सेवा पुरवणे ही एक प्रकारची नोकरीच आहे. अशा वेळी तुम्हाला वेतन मिळते, पण तुमच्या कामाचे तास आणि जबाबदाऱ्या कंपनी ठरवते.
  • व्यवसाय (Business): स्वतःचा व्यवसाय म्हणजे तुमच्या कौशल्यांचे आणि वेळेचे नियोजन करून फ्रिलांसिंग सेवा पुरवणे, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म किंवा स्वतःच्या वेबसाईटवर उत्पादने/ईबुक्स/कोर्सेस विकणे, नवनवीन साहित्य निर्माण करणे आणि त्याद्वारे अफिलिएट कमिशन किंवा ॲड रेव्हेन्यू कमावणे, इत्यादी. इथे तुम्ही स्वतः मालक असता. सुरुवातीला कदाचित उत्पन्न आणि व्यवसाय विस्ताराविषयी अनिश्चितता असू शकते, परंतु योग्य दिशेने प्रयत्न केल्यास दीर्घकालीन यश आणि वेळ/पैसे यांचे स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता जास्त असते.

ऑनलाईन व्यवसाय करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? (Requirements)

तुमच्या मोबाईल/लॅपटॉपचा वापर करून घरबसल्या पैसे कमावण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची आवश्यकता आहे:

१. बँक खाते (Bank Account)

तुमचे उत्पन्न जमा करण्यासाठी तुमच्या स्वतःच्या नावावर बँक खाते असणे आवश्यक आहे. त्याशिवाय तुमच्याकडे Visa, Mastercard, and American Express यांपैकी एका कंपनीचे आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यास सक्षम असलेले क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. स्वतःच्या वेबसाईट साठी डोमेन नेम, वेब होस्टिंग, थीम्स , किंवा सॉफ्टवेअर खरेदी करण्यासाठी किंवा इतर देशांमध्ये सेवा/उत्पादने विक्री केल्यानंतर स्वतःचे पैसे पेपाल किंवा अन्य पेमेंट प्रोसेसिंग प्लॅटफॉर्म्सद्वारे भारतात मिळवण्यासाठी या गोष्टी तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे.  

२. मोबाईल/लॅपटॉप (Mobile/Laptop)

जवळपास सर्व ऑनलाइन कामे तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर करू शकता. काही क्षेत्रांसाठी (उदा., व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक डिझाईन) उत्तम टेक्निकल स्पेसिफिकेशन्स असणाऱ्या हाय-एंड कॉम्प्युटरची गरज असू शकते.

३. इंटरनेट कनेक्शन (Internet Connection)

बहुतेक ऑनलाइन कामांसाठी तुम्हाला स्थिर आणि वेगवान इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असते. काही कामे मोबाईल डेटा चा वापर करून करणे शक्य असते मात्र जर दररोज १० जीबी पेक्षा जास्त डेटा वापर होत असल्यास वायफाय किंवा खासगी कंपन्यांचे एअर फायबर सबस्क्रिप्शन फायदेशीर ठरू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती, तुमच्या परिसरात इंटरनेटची उपलब्धता/वेग/किंमत आणि तुमच्या कामाची गरज यांनुसार तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता. 

४. प्रशिक्षण (Training)

जरी तुम्ही घरबसल्या पैसे कमावण्यासाठी उत्सुक असाल, तरीही काही मूलभूत गोष्टींचे आणि ज्या क्षेत्रात काम करणार आहात, त्याविषयी योग्य प्रशिक्षण घेणे खूप गरजेचे असते.  

तुमच्याकडे काही विशेष कौशल्य आहे का? (Knowledge/Expertise)

घरबसल्या पैसा कमवण्याच्या काही मार्गांसाठी विशिष्ट कौशल्यांची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ, जीपीटी साईट्स (Get Paid To) द्वारे मायक्रो-जॉब्स करण्यासाठी किंवा ऑनलाइन सर्वेक्षणांमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही खास ज्ञानाची आवश्यकता नाही. परंतु अशा कामांमधून नगण्य उत्पन्न मिळते, ज्यामुळे हा मार्ग मी कोणालाही सुचवत नाही. इतर मार्गांसाठी तुमची संबंधित विषयातील आवड, कौशल्ये, ज्ञान आणि मागील अनुभवांचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला कल्पना यावी यासाठी खाली काही उदाहरणे नमूद केली आहेत. 

  • लेखन (Writing): तुम्हाला लिहिण्याची आवड असल्यास तुम्ही लेखन, संपादन, कॉपीरायटींग इत्यादी क्षेत्रात काम करू शकता.
  • ग्राफिक डिझाईन (Graphic Design): तुमच्याकडे डिझाईनची समज असल्यास तुम्ही लोगो, सोशल मीडिया पोस्ट्स, लग्नपत्रिका, बारसा/मुंज/डोहाळे जेवण/साखरपुडा किंवा सामाजिक/राजकीय कार्यक्रमांसाठी बॅनर्स/पोस्टर्स डिझाईन करू शकता.
  • वेब डिझाईन आणि डेव्हलपमेंट (Web Design and Development): वेबसाइट डिझाईन आणि डेव्हलपमेंटचे कौशल्य असल्यास तुम्ही स्वतःचे किंवा इतरांच्या वेबसाईट्स तयार करू शकता.
  • डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing): सोशल मीडिया मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) इत्यादी डिजिटल मार्केटिंग कौशल्यांची मागणी आहे.
  • अनुवाद (Translation): तुम्हाला मातृभाषेव्यतिरिक्त अन्य भाषांचे ज्ञान असल्यास (विशेषतः परकीय भाषा) आणि एका भाषेतून दुसऱ्या भाषेत सहजतेने अनुवाद करणे शक्य असल्यास तुम्ही अनुवादकाचे काम करू शकता.
  • कोचिंग (Coaching): एखाद्या विषयाची चांगली माहिती असल्यास तुम्ही ऑनलाइन ट्युटोरिंग करू शकता किंवा त्या विषयासंबंधित ईबुक्स/कोर्सेस/मेंबरशिप्स तयार करून पैसे कमवू शकता. 

या यादीमध्ये दिलेल्या फक्त काही उदाहरणे आहेत. तुमच्या आवडी आणि कौशल्यांवर आधारित इतरही अनेक मार्ग आहेत. जर तुमच्याकडे कोणतेही विशेष कौशल्य नसेल, तर तुम्ही ऑनलाइन कोर्सद्वारे नवीन कौशल्ये शिकू शकता.

वेबसाइट/सोशल मीडिया प्रोफाइल तयार करणे (Website/Social Media Profile Building)

घरातून पैसा कमवण्याच्या काही मार्गांसाठी वेबसाइट किंवा सोशल मीडिया प्रोफाइल (फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी) असणे आवश्यक नसले तरीही, तुमच्या विश्वासार्हतेत वाढ आणि लोकांशी जोडण्यासाठी ते फायदेशीर ठरू शकते.

  • वेबसाइट (Website): जर तुम्ही फ्रीलांसर असाल, ब्लॉग चालवत असाल किंवा तुमचे स्वतःचे उत्पादन विकत असाल तर वेबसाइट तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. यासाठी तुमच्या सेवा, उत्पादने आणि तुमच्या स्वतःबद्दल माहिती देणारी वेबसाइट तयार करा. सध्या वेबसाईट बनवण्यासाठी खूप मोफत प्लॅटफॉर्म उपलब्ध असले, तरीही तुम्ही काही रुपये खर्च करून एक उत्तम व्यावसायिक आणि वेगवान वेबसाईट तयार करू शकता.
  • सोशल मीडिया प्रोफाइल (Social Media Profile): वेबसाईट सोबतच सोशल मीडिया प्रोफाईल्स असणेदेखील अत्यंत आवश्यक आहे. सध्या अनेक जणांची अगोदरपासूनच सोशल मीडियावर खाती असतात. फक्त त्यांचा व्यावसायिक दृष्टीने वापर कसा करावा हे समजून घेतले पाहिजे. सर्वप्रथम, तुमच्या क्षेत्राशी संबंधित फेसबुक ग्रुप्समध्ये सहभागी व्हा, तुमच्या कौशल्यांचे प्रदर्शन करणारे पोस्ट करा आणि तुमच्या सेवांची जाहिरात करा. त्याशिवाय तुम्ही इंस्टाग्राम आणि व्हाट्सॲप वर तुमच्या उत्पादनांचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करू शकता.

नक्की वाचा: स्वतःचा ब्लॉग कसा तयार करावा?

मोफत मार्केटिंग (Free Marketing Methods)

तुमच्या सेवा किंवा उत्पादनांची मोफत जाहिरात करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तुमच्या सेवा/उत्पादनांना जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी हे मार्ग उपयुक्त ठरू शकतात.

१. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांना सांगा (Tell Friends and Family)

तुमच्या सर्वात जवळच्या लोकांना तुमच्या नवीन व्यावसायिक उपक्रमांबद्दल सांगा. तुमच्या सुरुवातीच्या ग्राहकांमध्ये त्यांचा समावेश असू शकतो तसेच ते तुमच्या उत्पादनांचा/सेवांचा प्रचार करू शकतात.

२. ऑनलाइन समुदायांमध्ये सहभागी व्हा (Participate in Online Communities)

तुमच्या क्षेत्राशी संबंधित फेसबुक ग्रुप्स, व्हाट्सॲप ग्रुप्स, फोरम आणि ऑनलाइन समुदायांमध्ये सहभागी व्हा. तुमच्या ज्ञानाची देवाणघेवाण करा, इतरांना मनापासून मदत करा आणि तुमच्या सेवांची सुक्ष्म जाहिरात करा.

३. तुमच्या कौशल्यांचे प्रदर्शन करा (Showcase Your Skills)

तुमच्या क्षेत्राशी संबंधित ब्लॉगवर गेस्ट पोस्ट लिहा, युट्युबवर तुमच्या ज्ञानाचे/कौशल्यांचे प्रदर्शन करणारे व्हिडिओ बनवा किंवा तुमचे लेख तुमच्या स्वतःच्या वेबसाइटवर प्रकाशित करा. तुमच्या कामाची गुणवत्ता लोकांना आकर्षित करेल आणि तुमच्याशी संपर्क साधण्यास प्रवृत्त करेल.

४. सोशल मीडियावर सक्रिय रहा (Be Active on Social Media)

तुमच्या क्षेत्राशी संबंधित माहिती, टिप्स आणि युक्त्या शेअर करून नियमित सोशल मीडियावर सक्रिय रहा. तुमच्या क्षेत्रातील तज्ञ म्हणून तुमची ओळख निर्माण करा. लोकांशी संवाद साधा आणि त्यांच्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्या.

कमाईचे मार्ग (Earning Strategies)

आता आपण मोबाईल/लॅपटॉप आणि इंटरनेटचा सुयोग्य वापर करून घरबसल्या पैसे कमवायचे याबद्दलच्या काही लोकप्रिय मार्गांबद्दल जाणून घेऊ:

१. फ्रीलांसिंग (Freelancing)

फ्रीलांसिंग हा तुमच्या कौशल्यांचा वापर करून पैसे कमावण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तुमच्या वेळेचे नियोजन करून तुम्ही एक स्वतंत्र व्यावसायिक म्हणून काम करू शकता. वेब डिझाईन, ग्राफिक डिझाईन, लेखन, संपादन, अनुवाद, डाटा एंट्री, व्हिडिओ एडिटिंग इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये फ्रीलांसर म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध आहे. तुमची प्रोफाइल बनवून आणि तुमच्या सेवांची जाहिरात करण्यासाठी तुम्ही अपवर्क किंवा फाइव्हर सारख्या वेबसाइट्स वापरा. सुरुवातीला कमी दरात काम मिळण्याची शक्यता असली तरी, चांगली कामगिरी आणि सकारात्मक रिअव्ह्यूज तुमच्या प्रोफाइलला बळकटी देतील आणि तुमच्या कामाला अधिक मागणी निर्माण होईल, तसेच तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नात सुद्धा वाढ होईल.

२. ऑनलाइन ट्युटोरिंग (Online Tutoring)

जर तुम्हाला एखाद्या विषयाची चांगली माहिती असेल आणि तुम्हाला शिकवण्याची आवड असेल तर तुम्ही ऑनलाइन ट्युटोरिंग करू शकता. अनेक वेबसाइट्स आणि ॲप्स आहेत, ज्याद्वारे तुम्ही विद्यार्थ्यांशी जोडू शकता. सुरुवातीला तुम्ही गुगल मीट, झूम किंवा झोहो मीटिंग इत्यादी मोफत ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स किंवा व्हाट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही शिकवण्या घेऊ शकता. तुमच्या विषयावरील ज्ञान, शिकवण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची तुमची क्षमता तुम्हाला यश मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावते.

३. ऑनलाइन विक्री (Online Selling)

तुमच्या स्वतःच्या हस्तनिर्मित वस्तू, प्रिंटेड वस्तू (डायरी, पेन, कपडे, कॉफी मग, भेटवस्तू, इत्यादी), जुन्या/वापरलेल्या वस्तू किंवा इतर उत्पादने ऑनलाइन विकू शकता. खालील काही मार्ग आहेत:

  • स्वतःची वेबसाइट (Your Own Website): जर तुमच्याकडे अनेक उत्पादने असतील किंवा तुमच्या ब्रँडची ओळख निर्माण करायची असेल तर तुमची स्वतःची ई-कॉमर्स वेबसाइट सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. सुरुवातीला खर्च जास्त असू शकतो, पण दीर्घकालीन यशासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे.
  • ई-कॉमर्स वेबसाइट्स (E-commerce Websites): ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स वेबसाइट्सवर विक्रेता म्हणून नोंदणी करा आणि तुमची उत्पादने सूचीबद्ध करा. मोठ्या ग्राहकवृंदापर्यंत पोहोचण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे, परंतु यामध्ये स्पर्धा जास्त असू शकते.
  • ऑनलाइन मार्केटप्लेस (Online Marketplaces): फेसबुक मार्केटप्लेस आणि ओएलएक्स (olx.in) सारख्या ऑनलाइन मार्केटप्लेसेसवर तुमची नवीन किंवा जुनी/वापरलेली उत्पादने विकू शकता. स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि जुन्या वस्तू विकण्यासाठी हा एक उपयुक्त पर्याय आहे. मात्र हल्ली ऑनलाइन मार्केटप्लेसेसवर फसवणुकीचे प्रकार खूप वाढलेले आहेत, त्यामुळे आवश्यक सावधगिरी बाळगूनच काम करा आणि पैशांचे व्यवहार शक्यतो बँक खात्याद्वारे करा. रोकड रक्कम देऊन/घेऊन व्यवहार करताना फसवणूक होण्याचे प्रमाण जास्त असते आणि काही अनर्थ घडल्यास पोलिसांत तक्रार करताना व्यवहार केल्याचा पुरावा शिल्लक राहत नाही. 

नक्की वाचा: फेसबुक मार्केटप्लेसद्वारे संलग्न विपणन (Affiliate Marketing) कसे करावे?

ऑनलाइन विक्री करताना उत्तम गुणवत्तेचे उत्पादनांचे फोटो, स्पष्ट आणि सविस्तर वर्णन, वेबसाईट वापरण्यात सुलभता आणि चांगली ग्राहक सेवा यांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्याशिवाय तुमच्या स्पर्धात्मक फायद्यासाठी तुमच्या उत्पादनांमध्ये काहीतरी अनोखी गोष्ट (USP – Unique Selling Proposition) असणेसुद्धा आवश्यक आहे.

४. ब्लॉगिंग आणि व्हिडिओ ब्लॉगिंग (Blogging and Vlogging)

तुमच्या आवडीचा विषय असलेला ब्लॉग किंवा युट्युब चॅनेल सुरू करा. तुमच्या ब्लॉग/चॅनेलवर वाचकांची किंवा प्रेक्षकांची संख्या वाढली की, खालील मार्गांनी तुम्ही पैसा कमवू शकता:

  • जाहिराती (Advertising): तुमच्या ब्लॉगवर किंवा YouTube चॅनेलवर जाहिराती दाखवून तुम्ही पैसा कमवू शकता. तुमच्या युट्युब चॅनेलवर किती सब्सक्राईबर्स आणि व्ह्यूज आहेत, प्रेक्षकांची डेमोग्राफी, एंगेजमेंट यावर तुमची कमाई अवलंबून असते. ब्लॉगवर सुद्धा गुगल ऍडसेन्स किंवा इतर प्लॅटफॉर्म्सच्या जाहिराती दाखवून तुम्ही पैसा कमवू शकता.  
  • संलग्न विपणनाद्वारे कमिशन (Affiliate Commission): तुमच्या ब्लॉगवर किंवा युट्युब चॅनेलवर इतर कंपन्यांच्या उत्पादनांची जाहिरात करा आणि विक्री झाल्यावर कमिशन मिळवा. यासाठी तुमच्या आवडीच्या आणि तुमच्या वाचकांना/प्रेक्षकांना उपयुक्त असलेल्या उत्पादनांची/सेवांची जाहिरात करणे आवश्यक असते.
  • डिजिटल उत्पादनांची विक्री (Digital Products Sales): तुम्ही स्वतःचे ईबुक्स, ऑनलाइन कोर्सेस, प्रिंटेबल सामग्री (उदा. कॅलेंडर्स, डायरी, टेम्पलेट्स) इत्यादी विकू शकता. तुमच्या ब्लॉगवर किंवा युट्युब चॅनलवर या उत्पादनांची जाहिरात करा आणि तुमच्या वाचकांना/प्रेक्षकांना विक्री करा.
  • स्पॉन्सरशिप्स (Sponsorships): तुमच्या क्षेत्रातील कंपन्यांकडून तुमच्या युट्युब चॅनेल, सोशल मीडिया प्रोफाईल्स, किंवा वेबसाइटवर त्यांच्या उत्पादने/सेवांची जाहिरात करण्यासाठी तुम्ही स्पॉन्सरशिप मिळवू शकता. तुमच्या युट्युब चॅनेलवर किती सब्सक्राईबर्स आणि व्ह्यूज आहेत, सोशल मीडिया प्रोफाईल्सवर किती फॉलोवर्स व एंगेजमेंट आहे, तुमच्या वाचकांची/प्रेक्षकांची डेमोग्राफी (लिंग, वय, स्थान इत्यादी) यावर तुम्हाला मिळणाऱ्या स्पॉन्सरशिपची रक्कम अवलंबून असते. 

५. ऑनलाइन सर्वेक्षण (Online Surveys)

अनेक ऑनलाइन संस्था आणि कंपन्या ऑनलाइन सर्वेक्षणांमधून लोकांचे मत जाणून घेतात. या सर्वेक्षणांमध्ये सहभागी होऊन तुम्ही थोडे पैसे कमवू शकता. परंतु ही कमाई खूप कमी असते ज्यामध्ये तुमच्या वेळेचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे फक्त प्रतिष्ठित कंपन्यांच्याच सर्वेक्षणांमध्ये सहभागी व्हा आणि तुमची खासगी माहिती भरताना खूप सावध रहा.

६. डेटा एन्ट्री (Data Entry)

डेटा एन्ट्रीची कामे घरात बसून करता येतात. या कामांमध्ये संगणकावर माहिती टाइप करणे, फॉर्म भरणे, डेटाचे वर्गीकरण इत्यादींचा समावेश असतो. ही कामे जरी सोपी असली तरी ती रटाळवाणी आणि वेळखाऊ असू शकतात. तुमच्या टाइपिंग स्किल्स आणि संगणनाच्या ज्ञानावर तुमची कमाई अवलंबून असते. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, बहुतेक खासगी डेटा एन्ट्री जॉब्स फसवे असतात, ज्यामध्ये तुमच्याकडून डिपॉझिटच्या स्वरूपात काही रक्कम मागितली जाते आणि काम पूर्ण केल्यानंतर क्षुल्लक त्रुटी काढून पैसे देण्यास नकार दिला जातो. अशा वेळी तुमचे डिपॉझिटच्या स्वरूपात भरलेले पैसे, अमूल्य वेळ आणि मेहनत वाया जाते. त्यामुळे अत्यंत खात्रीशीर व्यक्ती किंवा कंपनीद्वारे काम दिले जात नसेल, तर अशा प्रकारचे काम स्वीकारू नका. 

७. वर्च्युअल असिस्टंट (Virtual Assistant)

तुम्ही एखाद्या व्यक्ती किंवा कंपनीसाठी वर्च्युअल असिस्टंट म्हणून काम करू शकता. तुमच्या कौशल्यांवर आधारित, ईमेल व्यवस्थापन, सोशल मीडिया व्यवस्थापन, वेब संशोधन, वेळापत्रक व्यवस्थापन इत्यादी कामे तुम्ही करू शकता. या कामासाठी चांगल्या संवाद कौशल्यांची आणि संगणनाच्या चांगल्या ज्ञानाची आवश्यकता असते.

८. सोशल मीडिया मॅनेजर (Social Media Manager)

सोशल मीडिया मॅनेजर म्हणून तुम्ही कंपन्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईल्सचे उदा. फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (पूर्वीचे ट्विटर), लिंक्डईन इत्यादींचे व्यवस्थापन करू शकता. यामध्ये सोशल मीडियासाठी संशोधन तसेच एकत्रित केलेल्या माहितीचे विश्लेषण करणे, नवनवीन पोस्ट्स/व्हिडिओ तयार करणे, जाहिरातींचे नियोजन करणे, ग्राहकांशी संवाद साधणे इत्यादींचा समावेश होतो. तुमच्या डिजिटल मार्केटिंगच्या ज्ञानावर आणि सोशल मीडियाच्या ट्रेंड्सवर तुमची यशस्वीता अवलंबून असते.

९. ऑनलाइन कोर्स तयार करणे (Create Online Courses)

तुम्हाला एखाद्या विषयाची चांगली माहिती असल्यास तुम्ही तुमचा स्वतःचा ऑनलाइन कोर्स तयार करू शकता. हा कोर्स तुम्ही तुमच्या स्वतःच्या वेबसाइटवर किंवा www.udemy.com सारख्या प्लॅटफॉर्मवर विकू शकता. तुमच्या कोर्सची गुणवत्ता, तुमचे संबंधित विषयावरील ज्ञान, प्रेझेंटेशन स्किल्स इत्यादी अनेक गोष्टींवर तुमच्या कोर्सचे यश अवलंबून आहे.

घरातून इंटरनेटद्वारे पैसे कमावताना काय करू नये? (What Not To Do)

घरबसल्या मोबाईल/लॅपटॉप आणि इंटरनेटद्वारे पैसे कमावताना काही गोष्टी अजिबात करू नयेत, त्या खाली नमूद केलेल्या आहेत. 

१. झटपट श्रीमंतीचे आश्वासन देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करू नका (Don’t Invest in Get Quick Rich Schemes)

इंटरनेटवर अनेक झटपट श्रीमंतीचे आश्वासन देणाऱ्या योजना आढळतात, ज्यामधील बहुतांश योजना फसव्या असतात. अशा योजनांमध्ये अजिबात गुंतवणूक करू नका. त्याऐवजी तुमच्या मेहनत आणि कौशल्यांवर विश्वास ठेवा आणि योग्य मार्गाने पैसे कमवा. 

२. तुमच्या बँक खाते किंवा खासगी माहिती कोणाशीही शेअर करू नका (Don’t Share Your Bank Account or Private Information with Anyone)

फक्त प्रतिष्ठित कंपन्यांशी आणि लोकांशी व्यवहार करा. तुमची बँक खाते किंवा खासगी माहिती कोणाशीही शेअर करू नका. उदा. क्रेडिट/डेबिट कार्डचा पिन, बँक खात्याची माहिती, वैयक्तिक/कौटुंबिक माहिती, ओटीपी.

याशिवाय कोणत्याही अनोळखी फोन नंबरवरून पाठवलेल्या एसएमएस किंवा संशयास्पद ई-मेल मधील लिंक्स वर चुकूनही क्लिक करू नका. तुमचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते.  

३. कोणत्याही कामासाठी खूप जास्त ठेव शुल्क/डिपॉझिट आकारणाऱ्या संस्थांपासून सावध रहा (Beware of Scams Charging Upfront Fees)

काही व्यक्ती किंवा कंपन्या ऑनलाइन कामे सुरू करण्यासाठी डिपॉझिट च्या स्वरूपात शुल्क आकारतात. हे शुल्क फसवेगिरीचे फार मोठे लक्षण असते. प्रतिष्ठित कंपन्या सहसा अशाप्रकारचे शुल्क आकारत नाहीत.

४. काम सुरु केल्यानंतर विलंब करू नका (Don’t Procrastinate)

यशस्वी होण्यासाठी तुमच्या वेळेचे नियोजन करणे आणि नियमित काम करणे आवश्यक आहे. तुमच्या कामांमध्ये ढिलाई/चालढकल करू नका. दिरंगाई केल्यास कोणत्याही कामाला नियोजित वेळेपेक्षा जास्त कालावधी लागेल आणि तुमची कार्यक्षमता कमीकमी होत जाईल. 

५. झटपट यशाची अपेक्षा करू नका (Don’t Expect Overnight Success)

घरबसल्या मोबाईल/लॅपटॉप आणि इंटरनेटद्वारे पैसे कमवणे हा दीर्घकालीन प्रवास आहे. यामध्ये कदाचित झटपट यश मिळणार नाही. त्यामुळे योग्य दिशेने मेहनत करा, शिकत राहा आणि तुमच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करा. यश नक्की मिळेल. 

समारोप (Conclusion)

घरबसल्या मोबाईल/लॅपटॉप आणि इंटरनेटद्वारे पैसे कमवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तुमच्या आवडी, कौशल्यांवर आधारित योग्य मार्ग निवडा आणि यशस्वी होण्यासाठी मेहनत करा. सुरुवातीला कमी उत्पन्न मिळेल, परंतु हळूहळू तुमची कमाई वाढत जाईल. शिकत राहा, प्रगती करा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा.

या ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीचा तुमच्या घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवण्याच्या प्रवासात तुम्हाला फायदा होईल अशी आशा आहे. तुमचे प्रश्न आणि सूचना खाली असलेल्या कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *