या लेखामध्ये आपण डोमेन म्हणजे काय (what is domain in Marathi) याविषयी माहिती घेऊ.
डोमेन म्हणजे आपल्या संकेतस्थळाचे नाव किंवा अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आपला ऑनलाईन पत्ता. आपल्या ब्लॉग अथवा संकेतस्थळाला भेट देण्यासाठी डोमेनचा उपयोग होतो.
उदा. https://anudinikar.com
सूची
डोमेनची रचना
डोमेन हे प्रामुख्याने तीन घटकांमध्ये विभागलेले असते.
१. प्रोटोकॉल
प्रोटोकॉल म्हणजे वेब सर्वर आणि वापरकर्ता (क्लायंट) यांच्यामधील संभाषणाचा नियम आहे.
प्रामुख्याने एचटीटीपी आणि एचटीटीपीएस असे दोन प्रोटोकॉल वापरले जातात. त्यांपैकी
एचटीटीपीचा अर्थ हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे तर एचटीटीपीएसचा अर्थ हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर आहे.
एचटीटीपीएस वरील संभाषण अधिक सुरक्षित असते. त्यामुळे एचटीटीपीएस वापरण्याचा सल्ला दिला जातो.
२. डोमेन (मुख्य भाग)
डोमेन म्हणजे शब्द किंवा अक्षरमाला किंवा अक्षरे, संख्या आणि चिन्हे (-) यांचा संयोग असू शकतो.
- domainname.com (शब्द)
- abcde.com (अक्षरमाला)
- domainname123 (अक्षर + अंक)
- domain-name.com (अक्षर + चिन्ह)
- domain-name123.com (अक्षर + अंक + चिन्ह)
डोमेनच्या मुख्य भागामध्ये आपण आपल्या आवडीचे शब्द किंवा अक्षरमाला वापरू शकता. फक्त असे डोमेन खरेदीसाठी उपलब्ध असावे लागते.
३. डोमेन एक्सटेंशन (टॉप लेव्हल डोमेन)
डोमेन एक्सटेंशन किंवा टॉप लेव्हल डोमेन म्हणजे डोमेनपुढे जोडला जाणारा भाग (प्रत्यय) असतो.
आपल्या गरजेनुसार व व्यवसायाच्या स्थळानुरूप कोणतेही डोमेन एक्सटेंशन निवडण्याचे स्वातंत्र वापरकर्त्याला असते.
.कॉम, .नेट, .ऑर्ग ही सर्वांत जास्त वापरली जाणारी डोमेन एक्सटेंशन्स आहेत.
डोमेन एक्सटेंशन्सचेही निरनिराळे प्रकार आहेत.
➤ जेनेरिक (सामान्य) डोमेन एक्सटेंशन्स
सर्वसाधारणपणे वापरली जाणारी डोमेन्स जेनेरिक या प्रकारात मोडतात. उदा., .कॉम (.com), .नेट (.net), .ऑर्ग (.org)
➤ सीसीटीएलडी अर्थात कंट्री कोड (देशासंबंधित) टॉप लेव्हल डोमेन एक्सटेंशन्स
प्रत्येक देशासंबंधित विशेष डोमेन एक्सटेंशन्स असतात. या डोमेन्सचे नियंत्रण ICANN (The Internet Corporation for Assigned Names and Numbers) ही संस्था आणि संबंधित टीएलडीचे कंट्री कोड व्यवस्थापक यांच्या समन्वयाने केले जाते. उदा., .इन (in), .एसजी (.sg), .सीएन (.cn)
➤ एनटीएलडी अर्थात न्यू डोमेन एक्सटेंशन्स
एनटीएलडी या प्रकारात नव्याने अंतर्भाव केलेल्या डोमेन एक्सटेंशन्सचा समावेश होतो. उदा., .ऑनलाईन (.online), .शॉप (.shop), .एक्सवायझेड (.xyz)
डोमेन नाव विकत घेण्यासाठी किती खर्च येतो?
सर्वसाधारणपणे एक सामान्य डोमेन नाव विकत घेण्यासाठी ₹७०० ते ₹१००० इतका खर्च येतो.
जर आपल्याला .कॉम, .नेट किंवा .ऑर्ग वगळता अन्य डोमेन नेम एक्सटेंशन असणारे डोमेन विकत घ्यायचे असेल तर त्यानुसार कमी-अधिक दर आकारला जाऊ शकतो.
डोमेन नाव विकत घेण्यापूर्वी आपण ही रक्कम किती आहे हे पाहू शकता.
खूप प्रसिद्ध असणारी व सामान्यतः कमी वर्णसंख्या असणारी डोमेन नावे प्रीमियम श्रेणीमध्ये दर्शवली जातात व त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम आकारली जाते. ही रक्कम ₹५०,००० ते लाखो रुपयांच्या घरातदेखील असू शकते.
डोमेनची उपलब्धता तपासणे
डोमेन नाव खरेदी करायचे असेल तर आपल्याला जे नाव हवे आहे त्या नावाची उपलब्धता तपासून पाहावी.
जर डोमेन नाव उपलब्ध नसेल किंवा प्रीमियम श्रेणीमध्ये असेल तर आपण इतर नावांचा किंवा डोमेन एक्सटेंशन्सचादेखील विचार करू शकता.
यासाठी डोमेन नेम जनरेटर्स खूप उपयोगी पडतात.
प्रसिद्ध डोमेन नेम जनरेटर्सची यादी खाली देत आहे.
- https://instantdomainsearch.com/domain/generator/
- https://www.namemesh.com/
- https://domainwheel.com/
- https://businessnamegenerator.com/domain-name-generator/
- https://www.panabee.com/
याशिवाय एक्सपायर्ड डोमेन नवे शोधण्यासाठी आपण एक्सपायर्डडोमेन्स.नेट (https://www.expireddomains.net) या संकेतस्थळाचा वापर करू शकता.
डोमेनची खरेदी कशी करावी?
जर आपल्याला पाहिजे असणारे डोमेन नाव उपलब्ध असेल तर ते डोमेन नाव आपण योग्य डोमेन रजिस्ट्रार कडून ठराविक कालावधीसाठी विकत घेऊ शकता.
नेमचीप व नेमसिलो हे माझे आवडीचे डोमेन नेम रजिस्ट्रार्स आहेत.
यांपैकी नेमचीप या संकेतस्थळावर डोमेन नाव कसे रजिस्टर करायचे याविषयी माहिती घेऊ.
प्रथम या लिंकवर क्लिक करून नेमचीप च्या डोमेन रजिस्ट्रेशन पेज ला भेट द्या.
मोकळ्या शोध रकान्या (सर्च बॉक्स) मध्ये आपले डोमेन नाव लिहा. डोमेन नाव शक्यतो इंग्रजी भाषेतच असावे.
उजव्या बाजूला असणाऱ्या शोधचिन्हावर (मॅग्निफायिंग ग्लास) वर क्लिक करा.
पुढील पानावर आपले डोमेन नाव व त्याची किंमत तपासून पहा. जर सर्व व्यवस्थित असेल तर ॲड टू कार्ट (Add to cart) या पर्यायावर क्लिक करा.
डोमेन नोंदणी शुल्क व आयकॅन शुल्क (ICANN fee) यांची बेरीज होऊन आपल्याला मोजावी लागणारी एकूण किंमत उजव्या कोपऱ्यात दर्शवली जाईल.
यानंतर View Item किंवा Checkout या पर्यायांवर क्लिक करून आपण शॉपिंग कार्ट पेज वर जाऊ शकता.
शॉपिंग कार्ट पेजवर उपलब्ध असलेल्या ड्रॉपडाऊनमधून आपण १० वर्षे कालावधीपर्यंत डोमेन नाव विकत घेण्याचा पर्याय निवडू शकता.
याशिवाय नेमचीप ठराविक डोमेन नावांसोबत मोफत गोपनीयता सुरक्षा (WhoisGuard Privacy Protection) प्रदान करते. जोपर्यंत आपण नेमचीपसोबत डोमेन रजिस्टर कराल तोपर्यंत ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल.
कन्फर्म ऑर्डर (Confirm Order) या बटणावर क्लिक करून साइन अप पेजवर पोहोचा. येथे सुरक्षित युजरनेम, पासवर्ड, आपले नाव, व ई-मेल ॲड्रेस वापरून नवीन अकाउंट तयार करा.
शेवटी आपला पत्ता व बिलिंग इंफर्मेशन भरून डोमेन नाव विकत घ्या. आंतरराष्ट्रीय कार्ड्स, पेपाल किंवा अकाउंट फंड्सद्वारे आपण देय रक्कमेचा भरणा करू शकता.
अभिनंदन! आपण आपले डोमेन नाव यशस्वीरीत्या रजिस्टर केले आहे.
मराठी भाषेतून लिहिलेली ही माहिती नव्याने ब्लॉगिंग क्षेत्रात येणाऱ्यांना नक्कीच उपयोगी ठरेल.