ब्लॉगसाठी फायदेशीर विषय कसा निवडावा (How to Find Profitable Blogging Niche in Marathi) हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे.
विचारपूर्वक निवडलेला ब्लॉगचा विषय आणि उत्तम दर्जाचा मजकूर या गोष्टी आपल्या ब्लॉगच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.
सर्वसाधारणपणे ब्लॉगर्स मनात येईल त्या कोणत्याही विषयावर ब्लॉग लिहितात, परंतु यामुळे भविष्यात नुकसान सहन करावे लागू शकते.
एका विशिष्ट विषयासंबंधित ब्लॉग लिहून आपले ज्ञान किंवा कौशल्य सिद्ध करणे आणि अर्थार्जन करणे हे निरनिराळया विषयासंबंधित ब्लॉग लिहिण्यापेक्षा तुलनेने सोपे असते.
तुम्हाला माहित आहे का?
आजमितीला जगभरात १.८ अब्जपेक्षाही जास्त संकेतस्थळे अस्तित्वात आहेत.
त्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या असा कारभार करण्यापेक्षा विशिष्ट विषयाचा तज्ञ म्हणून ओळख निर्माण करणे आपल्याला आवडेल आणि आपल्या ब्लॉगच्या वाढीकडेसुद्धा जास्त लक्ष देता येईल.
म्हणजेच आपले ज्ञान किंवा कौशल्य सिद्ध करून अर्थाजन करणे सहजरित्या शक्य होईल.
ब्लॉगसाठी फायदेशीर विषय कसा निवडावा यावर चर्चा करण्यापूर्वी आपण ब्लॉगचा विषय (निश/टॉपिक) म्हणजे काय याबद्दल माहिती घेऊ.
सूची
ब्लॉगचा विषय (ब्लॉगिंग निश/टॉपिक) म्हणजे काय?
ब्लॉगचा विषय (ब्लॉगिंग निश/टॉपिक) हा आपण निवडलेल्या बाजाराचा एक भाग असतो.
समजा, आपण पर्यटनासंबंधित विषयावर ब्लॉगिंग करण्याचे ठरवले आहे. या परिस्थितीत आपल्याला निरनिराळे विषय निवडण्याचे स्वातंत्र आहे. उदा. पर्यटन व्यवस्थापन, प्रेक्षणीय पर्यटनस्थळे, प्रवासवर्णन, हॉटेल्स, शेती पर्यटन (ॲग्रो टुरिझम), जंगलसफर, इत्यादी.
याशिवाय प्रत्येक विषयाचा उपविषयसुद्धा ब्लॉग लिहिण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. परंतु त्याविषयासंबंधित लेखांना वाचकांकडून मागणी असावी आणि आपल्याला आर्थिक मोबदला मिळेल याची खात्री असावी. उदा. महाराष्ट्रातील हॉटेल्स
ब्लॉगच्या उपविषयाचा अजून लहान भाग निवडून त्यावर आपण सूक्ष्मविषय ब्लॉग (मायक्रो-निश ब्लॉग) तयार करू शकता. उदा. मुंबईतील हॉटेल्स
वर नमूद केलेल्या माहितीचा आपण बाजार ते सूक्ष्मविषय असा पदानुक्रम तयार करू शकतो.
बाजार (इंडस्ट्री/मार्केट): पर्यटन
↳ विषय (निश/टॉपिक): हॉटेल्स
↳ उपविषय (सबनिश): महाराष्ट्रातील हॉटेल्स
↳ सूक्ष्मविषय (मायक्रो-निश): मुंबईतील हॉटेल्स
आता आपल्याला ब्लॉगचा विषय, उपविषय, आणि सूक्ष्मविषय म्हणजे काय याबद्दल माहिती मिळाली असेल याची मला खात्री आहे.
ब्लॉगसाठी फायदेशीर विषय कसा निवडावा?
ब्लॉगसाठी विषय निवडणे ही एक सोपी प्रक्रिया आहे. परंतु जर आपल्याला ब्लॉगद्वारे पैसे कमवायचे असतील तर सर्व विषय (निश) फायदेशीर असणार नाहीत.
आपले ज्ञान, संबंधित विषयावरील पकड, बाजार स्थिती, लोकांच्या समस्या व त्यावरील संभाव्य उपाय, आर्थिक उलाढाल, आपण निवडलेल्या विषयावरील ब्लॉगचे आयुष्य आणि एकंदरीत नफा इत्यादींचे गणित करूनच ब्लॉगचा विषय निवडणे जास्त संयुक्तिक ठरेल.
१. आपल्या आवडीचे विषय कोणते यावर विचारमंथन करणे
सर्वांत प्रथम आपल्याला आवडणाऱ्या विषयांची यादी तयार करा. नमुन्यादाखल मी येथे एक यादी बनवली आहे.
यादी क्रमांक १:
- चित्रपट (★)
- भ्रमणध्वनी
- संगणक
- स्वयंपाक
- योगासने
- ब्लॉगिंग (★)
- पुस्तके
- संगणकीय खेळ (★)
- संरक्षण
- सैन्य उपकरणे (★)
- राजकारण
- आधुनिक शेती (★)
यांपैकी मला सर्वांत जास्त आवडणाऱ्या पाच विषयांसमोर मी (★) चिन्ह केले आहे.
आता या विषयांपैकी एक किंवा अनेक विषयांवर मी ब्लॉग लिहिण्याविषयी विचार करू शकेन.
ब्लॉगसाठी फायदेशीर विषय निवडणे ही ब्लॉगिंगमधील महत्त्वाची पायरी असल्यामुळे यासाठी पुरेसा वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे.
अजूनही आपल्याला विषयांची यादी तयार करण्यास अडचण येत असेल तर खाली नमूद केलेल्या गोष्टींचा अवलंब करा.
१. आपण कोणती पुस्तकं, कादंबऱ्या, ईबुक्स वाचता हे लक्षात घ्या. आपल्या आवडीचे दूरदर्शनवरील कार्यक्रम, वृत्तपत्रातील बातम्यांचे मथळे, डिजिटल व्यासपीठांवरील कार्यक्रम आणि मालिका यांचा संदर्भ घ्या.
२. आपण कोणत्या क्षेत्रात काम करत होता, आता कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत, आपले छंद, अनुभव यांनुसार आपल्या आवडीचा विषय कोणता असेल याचा अंदाज बंधने सोपे होईल.
३. आपण कोणत्या गोष्टी यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत यावर ब्लॉग लिहिता येऊ शकेल. उदा. वजन कमी करणे, नवीन भाषा शिकणे, नवीन रुचकर पाककृती तयार करणे, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे, इत्यादी.
४. आपल्या आवडीचे रोजच्या व्यवहारातील विषय ज्यामध्ये वेळेनुसार फार बदल होत नाही, असे विषय ब्लॉगसाठी निवडणे फायदेशीर असतेच आणि आपण कमी श्रमात जास्त कालावधीपर्यंत अर्थार्जन करू शकता. उदा. गुंतवणूक सल्ला, विमा, बालसंगोपन (पॅरेंटिंग), वैयक्तिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, स्वयंपाक, नातेसंबंध (रिलेशनशिप), इत्यादी.
५. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आपली संबंधित विषयावर ब्लॉग लिहिण्याची आवड एक-दोन वर्षांनंतरसुद्धा कायम राहील याची आपणां स्वतःला खात्री असावी.
२. आपलं कोणत्या विषयांत प्राविण्य आहे हे ओळखणे
आपण ज्या विषयावर ब्लॉग लिहिता, त्या विषयावर आपले प्रभुत्व असणे खूप महत्त्वाचे असते.
कोणतीही चुकीची किंवा अर्धवट माहिती आपल्या वाचकांना देणे हे अत्यंत बेजबाबदार वर्तन आहे.
त्यामुळे आर्थिक गुंतवणूक, कायदेशीर बाबी, आरोग्य, औषधे, इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर ब्लॉग लिहिण्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि पुरेसा अनुभव असल्याखेरीज कोणतीही माहिती प्रकाशित करणे किंवा खात्रीशीर सल्ला देणे वाचकांना त्रासदायक ठरू शकते, याचे भान सदैव असले पाहिजे.
अर्थात आपल्या आवडीच्या विषयांत सर्वजण तज्ञ असतील असे नाही. अशावेळी नवनवीन गोष्टी शिकण्याची आपली तयारी असावी.
जेणेकरून आपण संबंधित विषयाचा अभ्यास करून आवश्यक ज्ञान संपादन करता येईल व ते इतरांसोबत सामायिक करता येईल.
पारंपरिक शैक्षणिक संस्था, तज्ञ व्यक्तींची पुस्तके व लेख, ब्लॉग्स, नियतकालिके, डिजिटल व्यासपीठांवरील खात्रीशीर माहिती प्रकशित करणाऱ्या व्यक्ती व संस्था, सरकारी माहिती प्रसारण वाहिन्या व संस्था यांच्याद्वारे आपणांस योग्य माहिती मिळू शकते.
एकूणच काय पुरेसे ज्ञान व अनुभव असल्याशिवाय दुसऱ्याला शिकवायला जाऊ नये हा मंत्र ब्लॉग लिहीतानाही लक्षात ठेवा.
३. ब्लॉगचा विषय अर्थार्जनासाठी अनुकूल असावा
ब्लॉगसाठी फायदेशीर विषय कसा निवडावा हा प्रश्न आपल्याला सतावत असेल तर आपण नक्कीच अर्थाजन करण्यासाठी अनुकूल असणारा ब्लॉगिंग विषय निवडणे अत्यंत महत्वाचे असते.
अशा परिस्थितीमध्ये आपल्या आवडीपेक्षा संभाव्य नफा किती होईल याचा विचार करावा लागतो. अर्थात त्या विषयावर प्रभुत्व असावे ही आत मात्र कायम राहील.
तसा हा मुद्दा खूप किचकट आहे, परंतु येथे मी आपल्याला अत्यंत सोपी युक्ती सांगणार आहे, जेणेकरून ब्लॉगसाठी फायदेशीर विषय कसा निवडावा या प्रश्नाचे उत्तर आपण स्वतः शोधू शकाल.
१. आपण ब्लॉगसाठी जो विषय निवडत आहात, त्या संबंधित लोकांच्या समस्या आहेत का? असल्यास कोणत्या आहेत? याची योग्य माहिती मिळवणे.
शिवाय त्या समस्येवर उपाययोजना कोणती आहे? ती सर्वसामान्य लोकांना परवडणारी आहे की फक्त श्रीमंतांना परवडणारी आहे? याचा अभ्यास करणेसुद्धा आपल्या फायद्याचे असते.
उदा. केसगळती ही समस्या महिला व पुरुष दोघांनाही भेडसावते आणि यामुळे खूप लोक चिंतीत असतात. यावर औषधे, आहारपूरक मात्रा (सप्लिमेंट्स) किंवा केशरोपण सुविधा उपलब्ध आहेत.
प्रत्येक व्यक्ती आपल्या आर्थिक ऐपतीप्रमाणे यांपैकी कोणताही पर्याय निवडू शकतो.
असा विषय निवडल्यास आपल्याला जाहिराती, संलग्न विपणन (Affiliate Marketing), प्रायोजित लेख (Sponsored Posts), स्वतःची वैद्यकीय संस्था असेल तर औषधे किंवा केशरोपण सुविधा पुरवणे, ईबुक्स व नियतकालिके विकणे, केसगळती रोखण्यासाठी शिकवणी कार्यक्रम (Courses) बनवून त्याचे शुल्क आकारणे, इत्यादी मार्गांद्वारे कमाई होऊ शकते.
लक्षात घ्या, या विषयावर ब्लॉग प्रकाशित करून फक्त गुगल जाहिरात व्यासपीठाचा वापर करणाऱ्या ब्लॉगर्सना तुलनेने कमी पैसे मिळतील.
परंतु संलग्न विपणन करणाऱ्या ब्लॉगर्ससाठी किंवा केशरोपण करणाऱ्या डॉक्टर्ससाठी मात्र हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असू शकेल.
त्यामुळे ब्लॉगिंग विषयाला अनुकूल अर्थार्जनाचा मार्ग निवडणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते.
२. आपण जो विषय ब्लॉगिंग साठी निवडणार आहेत त्यामध्ये जास्त वाचक असावे.
शिवाय जर त्या विषयासंबंधित उद्योग-व्यवसाय असतील,खूप आर्थिक उलाढाल होत असेल आणि लोक पैसे खर्च करत असतील तर असा विषय ब्लॉगसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.
वाचक वर्ग/कीवर्ड सर्च व्हॉल्युम/वेब ट्रॅफिक जास्त असणारे ब्लॉग जाहिरातींद्वारे चांगलं अर्थार्जन करू शकतात. उदा, मनोरंजन, क्रीडाविश्व इत्यादी.
व्यावसायिक विषयांवरील ब्लॉग्स संलग्न विपणन व वस्तूंच्या विक्रीसाठी उत्तम समजले जातात. उदा. उपकरणे, संगणक, सॉफ्टवेअर इत्यादी.
३. आपण निवडलेला विषय सदाबहार असावा, जेणेकरून कमी लेख लिहून जास्त कालावधीपर्यंत कमाई करता येते.
याउलट सध्या चर्चेत असणाऱ्या विषयांवर (ट्रेंडिंग टॉपिकवर) ब्लॉग लिहिल्यास कमी कालावधीत जास्त वेब ट्रॅफिक आणि कमाई करता येते, परंतु अशा ब्लॉग्सचे आयुष्य कमी असते.
४. आपण निवडलेल्या विषयासंबंधित जाहिराती आहे का हे पहा.
जर एखादा विषय फायदेशीर असेल तर जास्तीत जास्त व्यक्ती किंवा व्यावसायिक संस्था या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. यामुळे स्पर्धा वाढते आणि परिणामी जाहिराती करणे भाग पडते.
जर आपल्या विषयासंबंधित जाहिराती आपल्यास दिसत असतील, संलग्न विपणन कार्यक्रम असतील किंवा खूप स्पर्धा असेल तर नक्कीच तो विषय नफा मिळवून देणारा असतो.
अर्थात काही प्रादेशिक भाषांमध्ये डिजिटल मार्केटिंगचा फारसा शिरकाव न झाल्यामुळे आपल्याला तुलनेने कमी जाहिराती व स्पर्धा पाहायला मिळू शकते.
परंतु या संधीचा योग्य फायदा घेतल्यास भविष्यात आपल्या ब्लॉगची खूप भरभराट होऊ शकते.
मला खात्री आहे की हा लेख वाचून ब्लॉगसाठी फायदेशीर विषय कसा निवडावा याची योग्य माहिती मिळाली असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सामायिक करायला विसरू नका.
संबंधित लेख
अतिशय सुंदर शब्दात माहिती दिली आहे सोप्या भाषेत असल्याने लगेच समजते 👍