What is Blog Meaning in Marathi, अनुदिनी अर्थात ब्लॉग म्हणजे कायPin

या लेखामध्ये आपण अनुदिनी अर्थात ब्लॉग म्हणजे काय (What is Blog Meaning in Marathi) आणि ब्लॉगचे प्रकार कोणते याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

ब्लॉग म्हणजे काय? (What is Blog Meaning in Marathi)

ब्लॉग या शब्दाचा उगम वेबलॉग या इंग्रजी शब्दापासून झाला आहे. वेब म्हणजे संगणकीय आंतरजाल आणि लॉग म्हणजे एखाद्या माहितीची पद्धतशीर केलेली मांडणी. जेव्हा आपण एखादा विषय, वस्तू, सेवा, अनुभव किंवा प्रसंगाविषयी माहिती आंतरजालावर (इंटरनेटवर) सामायिक करतो, त्या माहितीस ब्लॉग असे संबोधले जाते.  

वेबलॉग या शब्दाचा वापर प्रथम जॉन बार्जर या व्यक्तीने १७ डिसेंबर १९९७ रोजी केला होता. त्यानंतर सुमारे दीड वर्षांनी म्हणजेच मे १९९९ मध्ये पीटर मरहोल्झ यांनी वेबलॉग या शब्दाची फोड वी + ब्लॉग (We + Blog) अशी केली. तेव्हापासून ब्लॉग हा शब्द प्रचलित झाला आहे.

अत्यंत सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ब्लॉग म्हणजे एखाद्या संकेतस्थळाचा नियमितपणे अद्ययावत केला जाणारा भाग, ज्यामध्ये वाचकांसाठी उपयुक्त माहिती, बातम्या, तज्ञ व्यक्तींची मते, चित्रे, ध्वनी, आणि ध्वनीचित्रफितींचा समावेश असतो. 

ब्लॉग मध्ये असणाऱ्या पोस्ट्स वेळेच्या उलट क्रमाने (रिव्हर्स क्रोनोलॉजिकल पद्धतीने) मांडलेल्या असतात. जेणेकरून आपण नवीन लेख सर्वांत प्रथम वाचू शकता. 

अनुदिनीचे (ब्लॉगचे) प्रकार कोणते? 

याअगोदरील भागात आपण अनुदिनी अर्थात ब्लॉग म्हणजे काय याविषयी माहिती घेतली. आता आपण ब्लॉगचे विविध प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये पाहू. 

१. छंद अनुदिनी (हॉबी ब्लॉग) 

ज्याप्रमाणे आपण दैनंदिनी लिहितो, त्याप्रमाणेच आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी, कविता, लेख, आपले अनुभव, प्रवासवर्णने आपण आपल्या छंद अनुदिनीद्वारे आंतरजालावर सामायिक करू शकता. 

२. व्यवसाय अनुदिनी (बिझनेस ब्लॉग) 

एखादी व्यक्ती किंवा संस्था व्यावसायिक कारणासाठी वाचकांसाठी उपयुक्त माहिती आंतरजालावर सामायिक करते, त्या माहितीस व्यवसाय अनुदिनी असे संबोधले जाते. शक्यतो बिझनेस ब्लॉग हा संबधित व्यक्ती किंवा व्यावसायिक संस्थेच्या अधिपत्याखाली असतो आणि यामध्ये वस्तू व सेवांविषयी विस्तृत माहिती प्रकाशित केली जाते. 

जास्तीत जास्त ग्राहकवर्ग गोळा करणे आणि त्यांना आपल्या वस्तू, सेवा, व व्यवसाय इत्यादींविषयी अद्ययावत माहिती पुरवणे हा व्यवसाय अनुदिनीचा मुख्य उद्देश असतो. 

तुम्हाला माहित आहे का?

नियमित ब्लॉग प्रकाशित करणाऱ्या कंपन्या, ब्लॉग प्रकाशित न करणाऱ्या कंपन्यांपेक्षा प्रतिमाह सरासरी ५५% अधिक रहदारी (वेब ट्रॅफिक) आणि ६७% जास्त संभाव्य ग्राहक (लीड्स) आकर्षित करतात. 

३. विषय अनुदिनी (निश ब्लॉग)

जेव्हा आपण फक्त एका विशिष्ट विषयासंदर्भात माहिती आंतरजालावर सामायिक करतो, तेव्हा त्याला विषय अनुदिनी अर्थात निश ब्लॉग असे संबोधले जाते. 

उदा. तंत्रज्ञान अनुदिनी (टेक्नॉलॉजी ब्लॉग), पाककला अनुदिनी, क्रीडा अनुदिनी इत्यादी. 

एखादी व्यक्ती आणखी खोलवर जाऊन संबंधित विषयाचा एक भाग ब्लॉगसाठी निवडू शकते. अशा लहान उपक्रमांना मायक्रो-निश ब्लॉग्स असे म्हटले जाते. शक्यतो मायक्रो-निश ब्लॉग्ससाठी संभाव्य रहदारी (वेब ट्रॅफिक), कमाई, स्पर्धा इत्यादी गोष्टी पाहून निर्णय घ्यावा लागतो.   

४. संलग्न विपणन अनुदिनी (अफिलिएट मार्केटिंग ब्लॉग)

जो ब्लॉग इतर व्यक्ती व व्यावसायिक संस्थांच्या वस्तू व सेवांचे विपणन करण्याच्या उद्देशाने बनवलेला असतो, त्यास अफिलिएट मार्केटिंग ब्लॉग असे म्हटले जाते.

यामध्ये ब्लॉगर्स ग्राहकांना उपयुक्त माहिती आपल्या ब्लॉग किंवा संकेतस्थळावर प्रकाशित करतात. जेव्हा एखादी व्यक्ती ती माहिती वाचून, प्रकाशकाने शिफारस केलेली वस्तू व सेवा त्याच्या अफिलिएट लिंकमार्फत विकत घेते, तेव्हा संबंधित व्यापारी किंवा ईकॉमर्स कंपनी काही रक्कम मोबदला (अफिलिएट कमिशन) म्हणून प्रकाशकास देते.

अशाप्रकारे सर्वांना फायदा होत असल्यामुळे संलग्न विपणन अनुदिनी अर्थात अफिलिएट मार्केटिंग ब्लॉग हा ब्लॉगिंगचा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. 

शिवाय वस्तू व सेवांच्या यादीचे व्यवस्थापन (इन्व्हेंटरी मॅनेजमेंट), प्रत्यक्ष विक्री, वाहतूक, ग्राहक सहकार्य, इत्यादी गोष्टी कराव्या लागत नसल्यामुळे बरेच प्रकाशक संलग्न विपणन अनुदिनी हा पर्याय निवडतात. 

५. सूक्ष्म अनुदिनी (मायक्रो ब्लॉग) 

सूक्ष्म अनुदिनीचा वापर अत्यंत कमी शब्दांत माहिती आंतरजालावर प्रकाशित करण्यासाठी केला जातो. उदा. ट्विटर, फेसबुक

६. वापरकर्त्यांची अनुदिनी (यूजर जनरेटेड ब्लॉग)

या प्रकारामध्ये ब्लॉगला भेट देणारे वापरकर्ते आपले अनुभव, तसेच एखाद्या विषयावरील माहिती, चित्रे, ध्वनी, व ध्वनिचित्रफिती ब्लॉगवर सामायिक करतात. येथे प्रकाशकाला साहित्य निर्मितीपेक्षा ब्लॉगवर कोणते साहित्य प्रकाशित व्हावे याकडे जास्त लक्ष द्यावे लागते. सुरुवातीला व्यक्तींद्वारे माहितीचे पुनरावलोकन व नियंत्रण केले जाते. मात्र कामाचा व्याप वाढला की यूजर जनरेटेड ब्लॉग मॉडरेशनसाठी तंत्रज्ञानाचे साहाय्य घ्यावे लागते.  

क्वोरा हे वापरकर्त्यांची अनुदिनीचे उत्तम उदाहरण आहे. 

याशिवाय ब्लॉगवर किती व्यक्तींचे प्रत्यक्ष नियंत्रण आहे यानुसार ब्लॉगचे वैयक्तिक ब्लॉग, सहयोगी अथवा गट ब्लॉग, आणि संस्थात्मक ब्लॉग असे प्रकार पडतात. 

मला खात्री आहे की हा लेख वाचून आपल्याला ब्लॉग म्हणजे काय (What is blog meaning in Marathi) याबाबत पुरेशी माहिती मिळाली असेल. जर हा लेख आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणी व सहकाऱ्यांसोबत शेअर करायला विसरून नका.

संबंधित लेख

Similar Posts

2 Comments

  1. छान अनुदिनी लिहिलतं…अजुन लिहा म्हणजे गरज पडल्यास लगेच उपाय सापडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *